भारताचे दिग्गज क्रिकेटर सुनिल गावसकर यांनी अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत एक भाकीत वर्तवलं आहे. यानुसार आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या ४० व्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळाडूंविषयी अफगाणिस्तानसाठी एक खेळाडू विजयात महत्त्वाचा ठरेल. हा खेळाडू म्हणजे प्रसिद्ध क्रिकेटर रशीद खान नाही, तर मुजीब उर रहमान हा आहे. गावसकर यांच्यामते मुजीब उर रहमान अफगाणिस्तानला विजय मिळवून देऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनिल गावसकर म्हणाले, “न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानसाठी मुजीबने खेळावं असं मला वाटतं. तसं झालं तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानसाठी हा फिरकीपटू अतिरिक्त ताकद ठरेल. तो या सामन्यात रशीद खान आणि मोहम्मद नबीसोबत आपली जादू दाखवू शकतो. या सामन्यात भारतासाठी छोटीशी आशा आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभवाची धुळ चारल्यास ही मोठी गोष्ट ठरेल.”

“मुजीब आणि रशीद अफगाणिस्तानसाठी निर्णायक ठरतील “

“मुजीब न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तानसाठी महत्त्वाचा शिलेदार असेल. कारण त्याच्या बॉलवर खेळणं वरूण चक्रवर्तीप्रमाणे अवघड असतं. विशेष म्हणजे मुजीबला आत्ताच वरूण चक्रवर्तीपेक्षा अधिक अनुभव आलाय. त्यामुळे मुजीब आणि रशीद या सामन्यात अफगाणिस्तानसाठी निर्णायक ठरतील,” असंही गावसकर यांनी नमूद केलं.

उपांत्य फेरीसाठी कडवी झुंज

टी २० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन संघांनी धडक मारली आहे. आता ग्रुप २ मधील न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत या संघात चुरस आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट होणार आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत धडक असणार आहे. मात्र अफगाणिस्तानने हा सामना जिंकल्यास धावगतीच्या जोरावर भारताला उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे.