ईडन गार्डन्स स्टेडियमवर शनिवारी भारताकडून पत्करलेल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघ खचला असला तरी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आव्हान बळकट करण्यासाठी त्यांना जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला नमवण्याची आवश्यकता आहे.
आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धामध्ये भारताकडून पाकिस्तानने ११वा पराभव पत्करला. २००९ मध्ये ट्वेन्टी-२०चे जगज्जेतेपद जिंकणाऱ्या पाकिस्तानची आशिया चषक क्रिकेट स्पध्रेमध्ये खराब कामगिरी झाली होती. दुर्दैवाने सर्वात खडतर गट म्हटल्या जाणाऱ्या दुसऱ्या गटात त्यांचा समावेश असल्याने त्यांना प्रत्येक लढतीत आव्हान असणार आहे. न्यूझीलंडने यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या दिग्गजांना हरवून ३ एप्रिलला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी दमदार दावेदारी केली आहे.
सलामीच्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताला हरवण्याची किमया साधल्यामुळे यंदाच्या विश्वचषकातील सर्वात समतोल संघ म्हणून तो उदयास येत आहे. फिरकीला साथ देणाऱ्या भारतीय खेळपट्टय़ांवर कशा प्रकारे रणनीती आखावी, हे न्यूझीलंड संघाला चांगले अवगत झाले आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर, लेग-स्पिनर इश सोधी आणि नॅथन मॅक्क्युलम हे येथील वातावरणाशी चांगलेच समरस झाले आहेत. धरमशाला येथे डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्क्लॅघनने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावला होता. कर्णधार केन विल्यमसनने वेगवान माऱ्याचे आधारस्तंभ टिम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांना अद्याप खेळवलेले नाही.
पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफीझ बांगलादेशविरुद्धच्या लढतीत चमकले होते. भारताविरुद्धच्या लढतीनंतर आफ्रिदीच्या रणनीतीवर कडाडून टीका झाली. त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी विजयाशिवाय पर्याय नाही.
न्यूझीलंड वि. पाकिस्तान
* स्थळ : आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली
* वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-१ आणि ३
संघ 
न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्तिल, हेन्री निकोल्स, ल्यूक राँची, रॉस टेलर, कॉलिन मुन्रो, मिचेल सँटनर, नॅथन मॅक्क्युलम, ग्रँट एलियट, मिचेल मॅक्क्लॅघन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिलने, इश सोधी, कोरे अँडरसन.
पाकिस्तान : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), अहमद शेहझाद, अन्वर अली, इमाद वसिम, खलिद लतीफ, मोहम्मद अमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद इरफान, मोहम्मद नवाझ, मोहम्मद सामी, सर्फराझ अहमद, शार्जिल खान, शोएब मलिक, उमर अकमल, वहाब रियाझ.

Story img Loader