श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर सहा विकेट्सने विजय
विश्वचषकासाठी भारतात आलेल्या घरच्या चाहत्यांच्या उत्साही प्रतिसादाने अफगाणिस्तानला श्रीलंकेला तोडीस तोड टक्कर देण्याचे बळ दिले. परंतु तिलकरत्ने दिलशानचा अनुभव श्रीलंकेच्या पथ्यावर पडला. त्यामुळे गतविजेत्या श्रीलंकेने सहा विकेट्स आणि चेंडू राखून विजय मिळवताना ट्वेन्टी-२० विश्वचषकात शानदार विजयी सलामी नोंदवता आली.
अफगाणिस्तानने श्रीलंकेला झगडायला लावले, परंतु अखेपर्यंत सामना हातून निसटलाय अशी परिस्थिती मात्र दिलशानने येऊ दिली नाही. दिलशानने ५६ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांनिशी नाबाद ८३ धावा केल्या आणि अन्य फलंदाजांना सोबतीला घेत छोटय़ा भागीदाऱ्या केल्या. दिलशानने दिनेश चंडिमल (१८) ४१ धावांची सलामी दिली. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज (नाबाद २१) पाचव्या विकेटसाठी नाबाद ४२ धावांची भागीदारी केली. यात अफगाणिस्तानच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाची भर पडली.
त्याआधी, असगर स्टॅनिकझाईच्या दमदार खेळीची नजाकत क्रिकेटरसिकांना पाहायला मिळाली. असगरने ४७ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांसह साकारलेया ६२ धावांच्या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ७ बाद १५३ धावा केल्या.
अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. मात्र ४ बाद ५१ अशा अवस्थेनंतर असगरने समिउल्लाह शेनवारीच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. शेनवारीने फक्त १४ चेंडूंत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून थिसारा परेराने टिच्चून गोलंदाजी करताना ३३ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान : २० षटकांत बाद १५३ (असगर स्टॅनिकझाई ६२, समिउल्लाह शेनवारी ३१; थिसारा परेरा ३/३३, रंगना हेराथ २/२४) पराभूत वि.
श्रीलंका : १८.५ षटकांत ४ बाद १५५ (तिलकरत्ने दिलशान नाबाद ८३, अँजेलो मॅथ्यूज नाबाद २१; मोहम्मद नबी १/२५).
सामनावीर : तिलकरत्ने दिलशान.