आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या फेरीत पुन्हा एकदा इतिहास रचला गेला आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यांच्या शेवटच्या दिवशी, नामिबियाने आयर्लंडवर ऐतिहासिक विजय नोंदवत सुपर १२ फेरीत प्रवेश केला. आफ्रिका खंडातील या छोट्या संघाने पहिल्यांदाच टी -२० विश्वचषकाच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. अबुधाबी येथे शुक्रवारी झालेल्या अ गटाच्या सामन्यात नामिबियाने आयर्लंडला केवळ १२५ धावांवर रोखले आणि त्यानंतर कर्णधार गेर्हार्ड इरास्मसच्या धडाकेबाज नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १९ व्या षटकात लक्ष्य गाठले.

मात्र क्वालिफायर फेरीच्या या सामन्यात असे काही घडले की ते  पाहून तुम्हाला नक्कीच हसु आवरणार नाही. आयर्लंड आणि नामिबिया यांच्यातील सामन्यात फलंदाज तीन वेळेस एकाच चेंडूवर धावचीत होण्यापासून वाचला. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात आयर्लंडचा संघ आपल्या डावातील शेवटचा चेंडू खेळत असताना एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. त्यावेळी क्रीजवर उपस्थित असलेल्या फलंदाजाने चेंडू खेळला आणि चेंडू संथ असल्याने त्याला फार दूर जाता आले नाही. तितक्यात गोलंदाज तेथे पोहोचला आणि त्याने फलंदाजाला आऊट करण्यासाठी स्टम्पजवळ थ्रो केला. पण चेंडू स्टम्पला लागला नाही आणि धावचीत करण्याची पहिली संधी हुकली.

दुसरीकडे, गोलंदाजाचा थ्रो पकडता न आल्याने कीपर देखील फलंदाजाला बाद करू शकला नाही. यानंतर चेंडू सीमारेषेवर पोहोचला आणि तेथून क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला, त्यानंतर यष्टीरक्षकाने धावचीत करण्याची संधी गमावली.

यष्टीरक्षकाने नंतर चेंडू पुन्हा नॉन स्ट्राइकिंग एन्डवर फेकला आणि पुन्हा एकदा तो लागला नाही. सलग तिसऱ्यांदा फलंदाजाला धावचीत करण्याची संधी गमावली. अशाप्रकारे एकाच चेंडूवर फलंदाजाला तीन वेळा प्रयत्न करुनही बाद करता आले नाही.

डावखुरा गोलंदाज जॅन फ्रॅलिंकच्या (३/२१) भेदक माऱ्यामुळे आयर्लंडला ८ बाद १२५ धावांपर्यंतच जेमतेम मजल मारता आली. त्यानंतर कर्णधार जेरार्ड इरास्मस (नाबाद ५३ धावा) आणि डेव्हिड वीज (नाबाद २८) यांच्या योगदानामुळे नामिबियाने आयर्लंडने दिलेले १२६ धावांचे लक्ष्य १८.३ षटकांत गाठले. त्यामुळे श्रीलंकेसह नामिबियाने ‘अ’ गटातून आगेकूच केली असून आता अव्वल-१२ फेरीत ते भारताचा समावेश असलेल्या दुसऱ्या गटातून खेळतील. आयर्लंड आणि नेदरलँड्स या संघांना मात्र प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

Story img Loader