विराटच्या धुवांधार फलंदाजीमुळे भारतीय क्रिकेट संघ ‘टी-२० वर्ल्ड कप’च्या उपांत्य फेरीत दाखल झाला. विराट कोहली भारताची नवी ‘रन-मशीन’ म्हणून उदयास आला असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रत्येक सामन्याबरोबर विराट फलंदाजीतले नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर कायम करत आहे.

सध्या मार्च महिना सुरू असून, आत्ताच विराटने वर्षभरात सर्वाधिक वेळा सामनावीर ठरण्याचा मान पटकावला आहे. याआधी शेन वॉटसनने २०१२ मध्ये पाच वेळा सामनावीर होण्याचा मान मिळवला.

आपल्या लक्षाचा मागोवा घेताना विराट शानदार फलंदाजी करतो. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना विराटची सरासरी १२२.८३ इतकी असून, ती अन्य सर्व फलंदाजांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटचे हे सलग चौथे अर्धशतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने अॅडलेडमध्ये ९०, मेलबर्नमध्ये ५९, सिडनीमध्ये ५० आणि मोहालीमध्ये ८२ धावा ठोकल्या आहेत. या सर्व धावा त्याने २०१६ मध्ये ठोकल्या आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणा एकाच फलंदाजाने एकाच विरोधी संघाविरुध्द ठोकलेली ही सर्वाधिक अर्धशतके आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्तापर्यंत ४०१ धावा बनविल्या आहेत. विराटच्या पुढे केवळ न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल असून, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४२४ धावा बनविल्या आहेत.

लक्षाचा मागोवा घेताना विराटने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ९१८ धावा काढल्या आहेत, तर त्याच्या पुढे असलेल्या न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमने १००६ धावा बनविल्या आहेत. असे असले तरी मॅक्युलमने ३८ सामने खेळून हे यश संपादन केले आहे, तर विराटने केवळ १९ सामने खेळून इतक्या धावा बनविल्या आहेत.

टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. याआधी २००७ आणि २०१४ मध्ये भारत उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता आणि २००७ मध्ये अंतिम सामन्यात यश संपादन करून भारताने पहिल्याच ‘टी-२० वर्ल्ड कप’वर आपले नाव कोरले होते.

Story img Loader