विराट कोहली हा जगातील सध्याचा सर्वोत्तम फलंदाज आहे, अशा शब्दांत भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी कोहलीचे कौतुक केले आहे. कोहलीच्या तडाखेबाज खेळाच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळविता आला होता.
‘‘मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्यासारखा अन्य कोणताही फलंदाज नाही, याबाबत मला तिळमात्र शंका नाही. तंत्रशुद्ध फलंदाजीबरोबरच आत्मविश्वासाने झंझावाती खेळ करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, हे त्याने वारंवार सिद्ध केले आहे. कांगारुंविरुद्ध त्याने केलेला धडाकेबाज खेळ सर्वानाच थक्क करणारा होता,’’ असे गावसकर यांनी सांगितले.
गावसकर म्हणाले, ‘‘कोणतेही दडपण न घेता तो सकारात्मक वृत्तीने फटकेबाजी करतो व संघाने त्याच्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडतो. ज्या ज्या वेळी भारतास विजयासाठी मोठे लक्ष्य मिळाले होते, त्या त्या वेळी त्याने चौफेर टोलेबाजी करीत संघास विजय मिळवून दिला आहे. त्याच्याकडे ताकदवान व अचूक फटके मारण्याची क्षमता आहे, अशी क्षमता असलेले फारच कमी फलंदाज असतात. विजयी फटका आपणच मारला पाहिजे अशी वृत्ती त्याने कधीही दाखविलेली नाही. अनेक वेळा त्याने कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सामना संपविण्याची संधी दिली आहे.’’
‘‘दडपणाखाली खेळताना अनेक मातबर फलंदाजही ढेपाळतात, मात्र कोहली याने अशा परिस्थितीत खूप संयमी वृत्ती दाखविली आहे. क्षेत्ररक्षण करतानाही त्याच्या या वृत्तीचा प्रत्यय अनेक वेळा पाहावयास मिळाला आहे. फलंदाजीच्या वेळी त्याच्या खेळात अतिशय परिपक्वता दिसून येते,’’ असेही गावसकर यांनी सांगितले. गावसकर यांनी धोनीचेही कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘धोनी याने युवराज सिंगकडे गोलंदाजी दिली. खरेतर कांगारूंसाठी हा आश्चर्यकारक निर्णय होता, मात्र त्याने कर्णधार स्टीव्हन स्मिथचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला. प्रतिस्पर्धी संघाची जमेची बाजू कोणती आहे व त्यांचा कमकुवतपणा कशात आहे याचा धोनी याला भरपूर अभ्यास आहे. सुरेश रैना हा खूप प्रभावीपणे चेंडू वळवत नाही व ऑस्ट्रेलियाविरुद्ध महागात पडला असता. त्याच्याऐवजी युवराजला चेंडू देण्याचा निर्णय भारतासाठी हितकारक ठरला. शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकांमध्ये खूप धावा दिल्या जाणार नाहीत याची काळजी आशीष नेहरा घेत असतो. तसेच तो सुरुवातीच्या षटकांमध्ये हमखास एकतरी बळी घेतो व प्रतिस्पर्धी संघाच्या डावास खिंडार पाडण्याचे काम करतो. त्याचे भारतीय संघातील पुनरागमन संघासाठी किफायतशीर ठरले आहे.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा