ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत दमदार फलंदाजी करणाऱ्या भारताच्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ट्वेन्टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. विश्वचषक स्पध्रेत उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतानेही क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे.
कोहलीने जवळपास ९२च्या सरासरीने चार सामन्यांत १८४ धावा काढल्या आहेत. त्याने ६८ गुणांची आघाडी घेत अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंचने ८०३ गुणांसह दुसरे, तर न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने (७६२) तिसरे स्थान पटकावले आहे.
गोलंदाजांमध्ये विंडीजच्या सॅम्युअल बद्रीने भारताचा फिरकीपटू आर. अश्विनला मागे टाकून अव्वल स्थानावर झेप घेतली. बद्रीने चार सामन्यांत सहा बळी घेतले आहेत. बद्रीच्या खात्यात ७५३ गुण आहेत.
सांघिक क्रमवारीत भारताने १२७ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले असून न्यूझीलंड (१२२) दुसऱ्या आणि वेस्ट इंडिज (१२०) तिसऱ्या स्थानावर आहे.

Story img Loader