यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला सुरुवातीच्या दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान आणि न्यूझीलंडनं टीम इंडियाला पराभूत केल्यामुळे वर्ल्डकपमधलं भारताचं आव्हान डळमळीत झालं आहे. आता अफगाणिस्तानच्या विजयावर भारताची पूर्ण भिस्त असणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागनं टीम इंडियाला सल्ला दिला आहे. संघातील ज्येष्ठ खेळाडूंना आता बाहेर बसवून नवोदित खेळाडूंना संधी द्यायला हवी, असं सेहवाग म्हणाला आहे. त्यामुळे त्याच्या या विधानावरून भारतीय क्रिकेट विश्वात चर्चा सुरू झाली आहे.

संघातल्या अनेक नवोदित खेळाडूंना आत्तापासूनच पुढील वर्ल्डकपसाठी तयार करायला सुरुवात करायला हवी. त्यासाठी संघातल्या सीनिअर खेळाडूंना आराम देऊन नवोदित खेळाडूंना अधिकाधिक संधी द्यायला हवी, असं सेहवाग म्हणाला आहे.

पुढील विश्वचषकाची तयारी!

“इशान किशन, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू कदाचित पुढच्या विश्वचषकात असतील. या खेळाडूंना तयार करून त्यांना संधी द्यायला हवी. कारण तेच भारतीय क्रिकेटचं भविष्य आहेत. त्यामुळे उरलेल्या अनुभवी खेळाडूंना ब्रेक देता येईल. जेणेकरून देशात किंवा विदेशात होणाऱ्या टी-२० सीरिजमध्ये हे खेळाडू खेळू शकतील. यातून मिळणाऱ्या अनुभवाच्या जोरावर हे खेळाडू स्वत:ला पुढच्या विश्वचषकासाठी तयार करू शकतील”, असं सेहवाग म्हणाला आहे.

दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापन देखील संघातील काही ज्येष्ठ खेळाडूंना आगामी न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यादरम्यान बाहेर बसवण्यावर विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध के. एल. राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

Story img Loader