फलंदाजांना पूर्णत: अनुकूल नसण्याची शक्यता
वानखेडेवर दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय सामन्यात साडेचारशे धावांचा डोंगर उभारल्यावर भारतीय संघाला धडकी भरली होती. हा सामना भारताने गमावला आणि पराभवाचा राग संघसंचालक रवी शास्त्री यांनी क्युरेटर सुधीर नाईक यांच्यावर काढला. हे प्रकरण शमते न शमते तोच ट्वेन्टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या २३० धावांचा पाठलाग इंग्लंडने यशस्वीपणे केला आणि वानखेडेची खेळपट्टी पुन्हा चर्चेत आली. आता उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी तरी अशी खेळपट्टी नसावी, याची धडकी भारतीय संघाने घेतली आहे. पण वानखेडेची खेळपट्टी थोडीशी संथ असेल, असे सूत्रांनी सांगितले असून भारतीय संघासाठी ही आनंदाची बाब असेल.
‘‘वानखेडेच्या खेळपट्टीचा नूर थोडासा बदलण्यात येणार आहे. खेळपट्टीवर थोडेसे गवत ठेवण्यात आले आहे, पण गेल्या सामन्यांपेक्षा ही खेळपट्टी कालांतराने थोडी संथ होत जाईल, पण ट्वेन्टी-२०च्या सामन्यासाठी ही चांगली खेळपट्टी असेल,’’ असे सूत्रांनी सांगितले आहे.
मोहालीची खेळपट्टी कालांतराने संथ होत जाते व त्या खेळपट्टीवर भारताने ऑस्ट्रेलियाचा १६१ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे या सामन्यात भारतावर धावांचा पाठलाग करण्याची परिस्थिती आली तर त्यांच्यासाठी वानखेडेची खेळपट्टी मोठा प्रश्न निर्माण करणार नाही.
मोठय़ा सामन्यांमध्ये बहुतांशी कर्णधार प्रथम फलंदाजी करायला प्राधान्य देतात. त्यामुळे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रथम फलंदाजी घेण्याचा विचार करेल. पण जर भारताला नाणेफेक जिंकता आली नाही व जर विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली, तर त्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग या खेळपट्टीवर सहजपणे करता येऊ शकतो.

Story img Loader