पीसीबीच्या सत्यशोधक समितीची शिफारस; मोहसीन खान प्रशिक्षकपदासाठी उत्सुक
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सातत्याने होत असलेल्या निराशाजनक कामगिरीला जबाबदार धरत प्रशिक्षक वकास युनूस आणि कर्णधार शाहिद आफ्रिदी यांची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) सत्यशोधक समितीने ठेवला आहे. पाकिस्तानचे माजी कसोटी सलामीवीर मोहसीन खान यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन यांनी पीसीबीचे कार्याध्यक्ष शहरयार खान यांची भेट घेऊन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. ‘‘सत्यशोधक समितीने अहवाल पीसीबीसमोर ठेवल्यानंतर मोहसीन मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान होऊ शकतात,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. काही वर्षांपूर्वी मोहसीन यांनी निवड समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते आणि त्यांची हंगामी प्रशिक्षक म्हणूनही निवड करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तान संघाने श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड यांना कसोटी मालिकेत पराभूत केले होते.
प्रशिक्षकपदासाठी मोहसीन यांच्यासह माजी कसोटी कर्णधार मोईन खान आणि माजी कसोटी गोलंदाज आकिब जावेद हेही उत्सुक असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. तसेच शहरयार खान यांनी पीसीबीचे पदाधिकारी नजम सेठी यांच्याशी परदेशी प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबत चर्चा केल्याचे समजते.

आफ्रिदीच्या नेतृत्वावर आलम यांची टीका
पाकिस्तान क्रिकेट संघाचे व्यवस्थापक इन्तिखाब आलम यांनी संघाच्या निराशाजनक कामगिरीसाठी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर टीका केली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेदरम्यान आफ्रिदी उगाच वादात अडकत होता. त्यावरही आलम यांनी नाराजी व्यक्त केली.

Story img Loader