कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने गुरुवारी रात्री आपल्या खास शैलीत ऑस्ट्रेलियन पत्रकाराचा समाचार घेतला. धोनीने पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर त्या पत्रकाराच्या तोंडूनच वदवून घेतले. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर कसे द्यावे ते शिकावे तर धोनीकडूनचं याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
भारताच्या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी पत्रकार परिषदेत बोलत होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियन पत्रकार सॅम्युल फेरीसने धोनीला टी-२० वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर तू यापुढेही खेळत रहाणार का ? असा प्रश्न विचारला. त्यावर धोनीने पत्रकाराला ‘इथे ये’ आपण थोडी गंमत करु असे म्हटले. यावर पत्रकार सॅम्युअलचीच विकेट उडाली. तो थोडा गोंधळला. धोनीने त्याच्या शेजारची खुर्ची थोडी सरकवली व तिथे सॅम्युलला बसण्यासाठी बोलावले. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना, धोनीने त्यास जवळ बोलावून घेतले. त्यानंतर पत्रकारालाच प्रश्न विचारत त्याच्याच तोंडून धोनीने त्याच्याच प्रश्नाचे उत्तर वदवले. सॅम्युल शेजारी बसल्यानंतर धोनीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला विचारले मी अनफीट आहे का ? पत्रकार म्हणाला नाही. मी रनिंग करताना हळुहळु धावतो का ? पत्रकार म्हणाला नाही. मी २०१९ चा विश्वचषक खेळताना तुम्हाला बघायला आवडणार नाही का ? त्यावरही पत्रकार म्हणाला नाही, नक्कीच आवडेल. तुला वाटते का मी निवृत्त व्हावे ? त्यावर नाही मला असे वाटत नाही, असे पत्रकार म्हणाला. त्यावर धोनीने तुला तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असावे असे सांगितले. त्यानंतर सॅम्युल आपल्या जागेवर जाऊन बसला.
WATCH: MS Dhoni’s reply to a journalist who asked him about his retirement plans #WT20 #IndvsWIhttps://t.co/STYW5Hh4xn
— ANI (@ANI_news) March 31, 2016