हिरवेगार गवत वेगवान गोलंदाजांना सहाय्यक; फिरकीला साथ मिळण्याची शक्यता कमी
सध्याच्या घडीला क्रिकेटविश्वात चर्चिला जाणारा विषय म्हणजे खेळपट्टी. भारतातील खेळपट्टय़ा फिरकीला पोषक असतात, असा कायमचा शिक्का बसलेला आहे. पण हा शिक्का ट्वेन्टी-२० क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पुसण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) होणार आहे. त्यानुसार ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गवत ठेवण्यात येणार आहे आणि याचा फायदा वेस्ट इंडिजपेक्षा इंग्लंडला अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयसीसीचे मुख्य खेळपट्टी निरीक्षक अँडी अ‍ॅटकिन्सन यांनी कोलकातामध्ये ठाण मांडला आहे. आतापर्यंत त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी स्थानिक क्युरेटरने न केल्याची काहींनी तक्रार केली होती. त्यामुळे आता स्वत:हून अ‍ॅटकिन्सन हे विश्वचषकाच्या अंतिम फेरीची खेळपट्टी बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानचा महत्त्वपूर्ण सामना या खेळपट्टीवर खेळवण्यात आला होता. या सामन्याच्या पहिल्या षटकामध्येच चेंडू वळत होते. त्यामुळेच पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना ११८ धावा करता आल्या होत्या. भारताची सुरुवातही निराशाजनक झाली होती, पण विराट कोहलीच्या खेळीने भारताने विजय मिळवला होता. न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यामधील सामन्यातही चेंडू चांगलाच वळत असल्याचे पाहायला मिळाले होते. न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी
करताना १४५ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडने फिरकी आणि संथ गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशला ७० धावांमध्येच गुंडाळले होते.
अंतिम फेरीचा सामना हा एकतर्फी होऊ नये, असे आयसीसीला वाटत आहे. त्याचबरोबर भारतामध्ये वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळू शकते, हे आयसीसीला दाखवून द्यायचे आहे. त्यामुळेच अंतिम फेरीसाठी नवीन खेळपट्टी बनवण्यात आली
आहे. आतापर्यंत ही खेळपट्टी एकाही सामन्यात वापरण्यात आलेली नाही.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशांचे वातावरण, खेळपट्टय़ा, खेळण्याची पद्धत यांच्यामध्ये बरीच तफावत आहे. इंग्लंडमधील थंड वातावरणात चेंडू चांगला स्विंग होतो. त्याचबरोबर खेळपट्टीवर गवत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे ही खेळपट्टी इंग्लंडसाठी घरच्यासारखीच असेल, असे वाटत आहे. या संघात जर इंग्लंडकडे जेम्स अँडरसन आणि ख्रिस ब्रॉडसारखे अनुभवी गोलंदाज असते, तर इंग्लंडला हा सामना जिंकणे फारसे अवघड नव्हते. इंग्लंडच्या या संघातही चांगले वेगवान गोलंदाज असले तरी त्यांच्याकडे तेवढा अनुभव नक्कीच नाही. इंग्लंडकडे सध्या ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, लायम प्लंकेट आणि बेन स्टोक्स हे वेगवान आणि मध्यमगती गोलंदाज आहेत. दुसरीकडे वेस्ट इंडिजकडे आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, कालरेस ब्रेथवेटसारखे मध्यमगती गोलंदाज आहेत. या खेळपट्टीचा फायदा वेस्ट इंडिजलाही काही प्रमाणात होऊ शकतो. पण त्यांच्यापेक्षा या खेळपट्टीवर कसे चेंडू टाकावेत, याचे चांगले ज्ञान असल्याने इंग्लंडचे पारडे जड असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा