वेस्ट इंडिजची अंतिम फेरीत धडक; भारतावर सात विकेट्सने मात; सिमन्स विजयवीर
वानखेडेवर गुरुवारी कॅरेबियन नाईट्सचा कॅलिप्सो थरार क्रिकेट विश्वाला अनुभवायला मिळाला. भारतीय संघासह पूर्ण स्टेडियमधील ३३ हजार चाहते विरोधात असले तरी स्वत:च्याच मस्तीत धुंद असणाऱ्या वेस्ट इंडिजला कसलीही तमा नव्हती. अभ्यासपूर्ण ठरवलेली रणनीती त्यांनी घोटवली. भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करत त्यांनी दोनशे धावांमध्ये रोखले. धावांचा पाठलाग करताना ख्रिस गेल स्वस्तात बाद झाला, तरी त्यांच्यावर दडपण नव्हते. सुदैवी लेंडल सिमन्सची नाबाद अर्धशतकी खेळी, त्याला मिळालेली जॉन्सन चार्ल्स आणि आंद्रे रसेल यांची सुयोग्य साथ वेस्ट इंडिजला थेट अंतिम फेरीच्या दालनात घेऊन गेली. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने भारतावर सात विकेट्सने विजय मिळवला. आता ३ एप्रिलला दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी वेस्ट इंडिजच्या पुरुषांसह महिला संघही इडन गार्डन्सवर उतरणार आहे. एकिकडे त्यांचा पुरुष संघ दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावते का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल, तर दुसरीकडे त्यांच्या महिलांचा संघ पहिल्यांदाच जेतेपदाला गवसणी घालतो का, याची साऱ्यांनाच उत्सुकता असेल.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. फॉर्मात नसलेला रोहित शर्मा आणि पहिल्यांदाच संधी मिळालेला अजिंक्य रहाणे, या दोन्ही मुंबईकरांनी भारतासाठी स्पर्धेतील सर्वाधिक ६२ धावांची सलामी दिली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रोहितने षटकार ठोकत धावगती वाढवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले. आंद्रे रसेलच्या पाचव्या षटकातील दुसरा चेंडू ‘नो बॉल’ होता आणि त्यावर रोहितने ‘स्क्वेअर लेग’ ला षटकार लगावला. त्यानंतच्या ‘फ्री-हिट’वर ‘लाँग ऑन’ला दुसरा षटकार ठोकत एका चेंडूत संघाला १३ धावा मिळवून दिल्या. धावांसाठी आसूसलेला रोहित आता मोठी खेळी साकारणार, असे दिसत असतानाच सॅम्युअल बद्रीने त्याला पायचीत पकडले. त्याने प्रत्येकी तीन चौकार आणि षटकार लगावत ४३ धावा फटकावल्या. रोहितनंतर विराट फलंदाजीला आला, पण नावावर फक्त एक धाव असताना यष्टीरक्षकाकडे चेंडू गेल्यावर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो बचावला. यष्टीरक्षकाने मारलेला चेंडू यष्टय़ांना लागला नाही, गोलंदाजानेही कोहलीला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, पण एका चेंडूवर दोनदा तो सुदैवी ठरला. त्यानंतरच्या आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दुसरी धाव घेतानाही तो धावचीत होताना बचावला. पंधराव्या षटकात त्याने दोन ‘गली’मधून काढलेला चौकार नजरेचे पारणे फेडणारा होता. अजिंक्य एका बाजूने आपली भूमिका चोख बजावत असताना कोहली या धावा जमवत त्याच्या जवळपास येऊन पोहोचला. १६ व्या षटकात मोठा फटका मारताना अजिंक्य बाद झाला, त्याने दोन चौकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. सतराव्या षटकात दुहेरी धाव घेत त्याने सलग दुसरे शतक पूर्ण केले. या षटकात त्याने तीन चौकार लगावत १७ धावांची लूट केली. १९ व्या षटकात दोन चौकार आणि एका षटकारासह भारताने १९ धावा लुटल्या. ब्राव्होच्या अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कोहलीला चौथे जीवदान मिळाले. या षटकात या दोघांनी घेतलेल्या तीन धावा कौशल्यपूर्ण होत्या. या षटकात १२ धावा मिळवत भारताचा डाव २ बाद १९२ या सन्मानजनक धावसंख्येवर येऊन ठेपला.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. पण दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराच्या चेंडूने गेलच्या उजव्या यष्टीचा अचूकपणे वेध घेतला आणि स्टेडियम दणाणून गेले. जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी अपेक्षित धावगती कायम राखताना तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी घातक वाटत असताना धोनीने कोहलीच्या हाती चेंडू सुपूर्द केला आणि पहिल्याच चेंडूवर त्याने चार्ल्सचा बळी मिळवला. चार्ल्सने ५ चौकार आमि दोन षटकार लगावत ५२ धावा केल्या. दुसरीकडे सिमन्स हा सुदैवी ठरत होता. १८ आणि ५० धावांवर असताना तो झेल बाद झाला होता, पण दोन्ही वेळा ‘नो बॉल’ने त्याला तारले. अर्धशतक झळकावल्यावर त्याचा झेल रवींद्र जडेजा सीमारेषेवर टिपला खरा, पण त्याचा पाय सीमारेषेला लागल्यामुळे तो षटकार ठरवण्यात आला. त्यानंतर सिमन्सची तोफ विजयावर शिक्कामोर्तब झाल्यावरच थंडावली. अखेरच्या दोन षटकांमध्ये प्रत्येकी एक षटकार आणि चौकार लगावत आंद्रे रसेलनेही विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार लगावत त्याने विजयाला गवसणी घातली. सिमन्सने ७ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ८२ धावांची खेळी साकारली, रसेलने तुफानी फलंदाजी करत २० चेंडूंत ३ चौकार आणि चार षटकार लगावत नाबाद ४३ धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत २ बाद १९२ (विराट कोहली नाबाद ८९, रोहित शर्मा ४३, अजिंक्य रहाणे ४०; सॅम्युअल बद्री १/२६) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १९.४ षटकांत ३ बाद १९६ (लेंडल सिमन्स नाबाद ८२; जॉन्सन चार्ल्स ५२, आंद्रे रसेल नाबाद ४३; विराट कोहली १/१५, आशीष नेहरा १/२३).
सामनावीर : लेंडल सिमन्स
सिमन्सचा जीवदानांचा प्रवास
* वेस्ट इंडिजची स्थिती २ बाद ४९ आणि लेंडल सिमन्स १८ धावांवर असताना रवीचंद्रन अश्विनच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने अफलातून झेल टिपला. मात्र रिप्लेमध्ये हा चेंडू नोबॉल असल्याचे स्पष्ट झाले.
* वेस्ट इंडिजची स्थिती ३ बाद १३१ आणि लेंडल सिमन्स ५० धावांवर असताना हार्दिक पंडय़ाच्या फुलटॉस चेंडूवर रवीचंद्रन अश्विनने सोपा झेल टिपला. मात्र रिप्लेमध्ये हा चेंडू नोबॉल असल्याचे स्पष्ट झाले.
’वेस्ट इंडिजची स्थिती ३ बाद १६१ आणि लेंडल सिमन्स ६८ धावांवर असताना जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर सिमन्सने टोलवलेला चेंडू सीमारेषेवर रवींद्र जडेजाने टिपला. तो स्वत: सीमारेषेबाहेर जात असल्याने त्याने चेंडू विराट कोहलीकडे सोपवला. मात्र त्याचवेळी त्याचा पाय सीमारेषेवर पडल्याने पंचांनी षटकाराचा निर्णय दिला.
अफगाणिस्तानविरूद्धच्या लढतीनंतर मला निवडसमितीचा दूरध्वनी आला. मी खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे का अशी त्यांनी विचारणा केली. मी हो म्हटले. संपूर्ण विमानात मी झोप काढली आणि ताजातवाना झालो. आयपीएल स्पर्धेदरम्यान मुंबई इंडियन्सकरता खेळतो. वानखेडेच्या खेळपट्टीची मला कल्पना होती. खेळपट्टीवर उतरल्यानंतर खेळाचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. या खेळपट्टीवर १८० ते १९० या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. माझ्या चाहत्यांसमोर कर्तृत्त्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. भारताला दहा धावा कमी पडल्या अशी चर्चा झाली. ते मला पटले. दोन नोबॉल आणि सीमारेषेवर टिपलेल्या झेलाचे षटकारात झालेले रुपांतर अशी तीन जीवदाने मला मिळाली आणि त्यांचा मी पुरेपूर फायदा उठवला.
– लेंडल सिमन्स, सामनावीर
१९३ : ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीत धावांचा पाठलाग करतानाची सर्वोच्च धावसंख्या. २०१० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरूद्ध १९२ धावा केल्या होत्या.
१९२/२ : ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या.
१६ : ट्वेन्टी-२० प्रकारात अर्धशतक किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या सर्वाधिक खेळींचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर. प्रत्येकी १५ अर्धशतकांसह ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्क्युलम यांच्या नावावर हा विक्रम होता.
३१९ : एका विश्वचषकात एका फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर.
लेंडल सिमन्सने भारतात झळकावलेल्या सलग अर्धशतकांची संख्या. आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पात्रता फेरीत (६५) तर अंतिम लढतीत (६८) धावांची खेळी साकारली होती.