वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर चार विकेट्स राखून मात
मार्लन सॅम्युअल्सची महत्त्वपूर्ण खेळी
कालरेस ब्रेथवेटच्या वेगवान खेळीने विजयावर शिक्कामोर्तब

आज किनाऱ्याकिनाऱ्यांवर सॅटेलाइटद्वारे एकच सोहळा सर्वांपर्यंत पोहोचलाय.. आम्ही जगज्जेते झालो आहोत. होय, आम्ही विश्वविजेते झालो आहोत. तेव्हा प्रत्येकाला कळू दे की, आम्ही आहोत चॅम्पियन, डान्स चॅम्पियन, डान्स चॅम्पियन, डान्स चॅम्पियन.. या चॅम्पियन डान्स गाण्याच्या ओळी.. यावर वेस्ट इंडिजच्या संघाने उपांत्य फेरी जिंकल्यावर नृत्य केले होते. तोच नृत्याविष्कार आपल्या अवीट आनंद देणाऱ्या खेळासह ईडन गार्डन्सवरही दाखवला आणि साऱ्यांची मने या जिंदादिल, मनस्वी खेळाडूंनी जिंकली. ‘आम्हीच चॅम्पियन आहोत’ हे फक्त त्यांनी सांगितले नाही, तर तसा खेळही करूनही दाखवला. गोलंदाजी दमदार झालीच होती, फलंदाजीमध्ये गाडी घसरत होती. पण २०१२च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजचे विश्वविजयाचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या मार्लन सॅम्युअल्सने एकाकी झुंज दिली आणि वेस्ट इंडिजला अद्वितीय विश्वविजय साकारता आला. सॅम्युअल्सने विजयाचे दार किलकिले केले होतेच, ते अखेरच्या षटकात सलग चार षटकारांनी पुरते उघडण्याची चोख जबाबदारी कालरेस ब्रेथवेटने पूर्ण केली. थरारक अंतिम फेरीत वेस्ट इंडिजने इंग्लंडला चार विकेट्स राखून पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली. या विजयासह वेस्ट इंडिजचे हे वर्षांतले तिसरे विश्वविजेतेपद ठरले. फेब्रुवारी महिन्यांत त्यांच्या युवा संघाने विश्वचषक पटकावला होता. त्यानंतर याच मैदानात महिलांनी आणि त्यानंतर पुरुषांनी विश्वचषक उंचावला.
सॅम्युअल बद्रीने घेतलेला पहिल्याच षटकात जेसन रॉयच्या त्रिफळ्याचा वेध, ही त्याची नांदी होती. ठराविक फरकाने त्यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत धाडण्याचे काम चोख बजावले, अपवाद फक्त जो रूटचा. रूटने सर्वागसुंदर तंत्रशुद्ध इंग्लिश क्रिकेटच्या पुस्तकातील फटक्यांच्या जोरावर ३६ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. पण त्याचा अपवाद वगळता एकही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. रूटला यावेळी जोस बटलरने (३६) यांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. बद्री, कालरेस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो यांनी तिखट मारा करत इंग्लंडच्या धावांना वेसण घातली.
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची ३ बाद ११ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यांनी ख्रिस गेल, जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स हे तिनही विजयवीर लवकर गमावले. रूटने दुसऱ्या षटकात दोन बळी मिळवत वेस्ट इंडिजला पिछाडीवर ढकलले. पण विजयाध्याय लिहिणारा सॅम्युअल्स खेळपट्टीवर ठाण मांडून उभा होता. इंग्लंडची गोलंदाजी बोथट करत त्याने संघांवरील दडपण कमी केले. ड्वेन ब्राव्होच्या साथीने तो विश्वविजयाचे स्वप्न पुन्हा एकदा साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. विजयाचे घरटे बांधण्यासाठी तो काडी काडी जमवत होता. ब्राव्होबरोबर त्याने चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. ब्राव्हो बाद झाल्यावर त्याने आक्रमक फटकेबाजीला सुरुवात केली. पण ब्राव्हो बाद होण्यापूर्वी सॅम्युअल्सने अर्धशतक पूर्ण केले. १५व्या षटकात त्याने दोन षटाकार आणि एक चौकार लगावला. अप्रतिम खेळी साकारत त्याने वेस्ट इंडिजला विजयाच्या दारात उभे केले होते. पण तरीही त्यांना जिंकायला अखेरच्या षटकात १९ धावांची गरज होती. बेन स्टोक्ससारखा अव्वल गोलंदाज समोर होता. मात्र ब्रेथवेटने कसलीही पर्वा न करता सलग चार षटकार लगावत विजयावर वेस्ट इंडिजच्या शैलीत शिक्कामोर्तब केले. सॅम्युअल्सने विजयी खेळी साकारत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ८५ धावांची खेळी साकारत विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर ब्रेथवेटने फक्त १० चेंडूंत १ चौकार आणि चार उत्तुंग षटकाराच्या मदतीने नाबाद ३४ धावांची अफलातून खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : २० षटकांत ९ बाद १५५ (जो रूट ५४, जोस बटलर ३६; सॅम्युअल बद्री २/१६, कालरेस ब्रेथवेट ३/२३) पराभूत वि. वेस्ट इंडिज : १९.४ षटकांत ६ बाद १६१ (मार्लन सॅम्युअल्स नाबाद ८५, कालरेस ब्रेथवेट नाबाद ३४; जो रूट २/९, डेव्हिड विली ३/२०)
सामनावीर : मार्लन सॅम्युअल्स.
मालिकावीर : विराट कोहली.

Story img Loader