खेळ सारखा, नियम सारखे; मात्र पुरुषांच्या आणि महिलांच्या क्रिकेटमधील मानधनांमध्ये कमालीची तफावत हे वास्तव आहे; परंतु हे वास्तव स्वीकारणाऱ्या भारतीय कर्णधार मिताली राजने पत्रकार परिषदेत या संदर्भातील प्रश्नाच्या ‘बाऊन्सर’चा आत्मविश्वासाने सामना केला. ती म्हणाली, ‘‘आम्ही एकच खेळ खेळत असल्याने समान मानधनाची अपेक्षा करणे स्वाभाविक आहे; परंतु महिलांपेक्षा पुरुषांचे क्रिकेट अधिक प्रमाणात लोकप्रिय आहे, कारण एक मनोरंजन पॅकेज म्हणून पुरुषांच्या क्रिकेटने हे यश मिळवले आहे. खूप मोठय़ा प्रमाणात ते पाहिले जात असल्यामुळे महिलांच्या क्रिकेटच्या तुलनेत अधिक महसूल तिथून मिळतो.’’ दोन्ही क्रिकेटमधील हा फरक मांडूनच ती थांबली नाही, तर वर्ष-दोन वर्षांत महिलांचे क्रिकेट अधिक उंचावेल. चाहतेसुद्धा अधिक प्रमाणात ते पाहू लागतील व मग समान मानधनाची मागणी करता येऊ शकते, असा आशावाद तिने प्रकट केला.
मुंबईत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रक घोषणेच्या कार्यक्रमात पुरुषांच्या पारितोषिक रकमेत ८६ टक्क्यांनी, तर महिलांच्या रकमेत १२२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात जिथे पुरुषांच्या क्रिकेटसाठी आयसीसी ५६ लाख डॉलर्सची आर्थिक पारितोषिके देते, तिथे महिलांच्या क्रिकेटसाठी फक्त चार लाख डॉलर्स रकमेची बक्षिसे देते. याशिवाय ट्वेन्टी-२० विश्वचषकात महिलांचे सामने प्रामुख्याने दुपारच्या सत्रात होतात, तर पुरुषांचे सामने प्रकाशझोतात ‘प्राइम टाइम’ नामक रात्रीची मोक्याची वेळ साधून दाखवले जातात. तिकीट दर आणि अन्य अनेक बाबतींमध्येही महिलांच्या क्रिकेटची परवड होताना दिसते.
रविवारी भारत-ऑस्ट्रेलियाच्या सोबतीने महिलांचा भारत-वेस्ट इंडिजसुद्धा सामना होत आहे. त्यामुळे मोहालीचे स्टेडियम, भारताची पाठराखण करणारे चाहते, हे सारे यानिमित्ताने महिलांना आपसूकपणे मिळणार आहे. उपांत्य व अंतिम फेरीच्या सामन्यांसाठीसुद्धा आयसीसीने हीच योजना आखली आहे. आयसीसीने महिलांच्या क्रिकेटबाबत विकासाची पावले उचलताना सुरुवातीला तरी त्यांना पुरुषांच्या बरोबरीने आणण्यासाठी साखळीपासूनच प्रत्येक दिवशी एका मैदानावर एक महिला आणि पुरुष सामन्याचा हा पर्याय संपूर्णपणे राबवण्याची आवश्यकता आहे. श्रीलंकेत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे सामने मोफत ठेवण्यात आले होते. अगदी २०१३ मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा झाली; परंतु या स्पध्रेला पुरेसा प्रेक्षकवर्ग मिळू शकला नाही.
१९७५ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाला प्रारंभ झाला आणि क्रिकेटच्या सोनेरी दिवसांना खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला; पण महिलांची पहिली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा १९७३ मध्ये झाली होती, ही वस्तुस्थिती आहे. क्रिकेटचे अर्थकारण कमालीचे बदलणाऱ्या आयपीएलचे यंदा नववे पर्व सुरू आहे; परंतु महिलांच्या आयपीएलची चर्चा कुठेच ऐकायला मिळत नाही. अधूनमधून पुरुषांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महिला खेळल्याची उदाहरणे सापडतात. दहा वर्षांपूर्वी भारतातील महिलांचे क्रिकेट बीसीसीआयच्या आधिपत्याखाली आले. त्यांनाही आता मानधन प्रणाली लागू झाली आहे. तूर्तास, येत्या काही वर्षांत महिलांच्या क्रिकेटलाही सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा करू या!
– प्रशांत केणी