उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर सहा धावांनी मात : ऑस्ट्रेलियाचे आव्हान
आतापर्यंतच्या तीन विश्वचषकांमध्ये वेस्ट इंडिजच्या महिला संघांची धाव उपांत्य फेरीपर्यंतच मर्यादित राहत होती. त्यामुळे महिला क्रिकेटमधले ‘चोकर्स’ असे म्हणूनही त्यांना हिणवले जायचे. पण अखेर दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारण्याची किमया साधली. वानखेडेवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर सहा धावांनी विजय मिळवला. ब्रेटनी कूपर आणि स्टेफनी टेलर या दोघी त्यांच्या या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. कूपरने कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावल्यामुळे वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करताना १४३ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ चांगला पाठलाग करत असताना दोन्ही स्थिरस्थावर झालेल्या फलंदाजांना एकाच षटकात बाद करत टेलरने हा सामना वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकवला. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे.
न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि त्यांनी वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी पाचारण केले. वेस्ट इंडिजला चांगली सुरुवात करून देणाऱ्या हायले मॅथ्यूजला (१६) मोठी खेळी साकारण्यात अपयश आले, पण कर्णधार स्टेफनी टेलरने (२५) धावफलक हलता ठेवण्याची कामगिरी चोख बजावली. दुसऱ्या बाजूने ब्रिटनी कूपरही स्थिरस्थावर होऊ पाहात होती. या जोडीने मोठय़ा धावसंख्येसाठी योग्य पायाभरणी केली असली तरी टेलरला डिव्हानने बाद करत ही जोडी फोडली. टेलर बाद झाल्यावर वेस्ट इंडिजची अव्वल अष्टपैलू खेळाडू दिएंद्रा डॉटिन फलंदाजीला आली. लेइघ कॅस्परेकच्या सतराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लाँग ऑनला डावातील पहिला षटकार लगावत कूपरने अर्धशतक पूर्ण केले. कूपरच्या कारकीर्दीतील हे पहिले अर्धशतक होते आणि ४५व्या सामन्यात तिला ही कामगिरी करता आली. अर्धशतक पूर्ण झाल्यावर त्यानंतरच्या चौथ्या चेंडूवरही षटकार लगावत कूपरने आपले इरादे स्पष्ट केले. सतराव्या षटकानंतर वेस्ट इंडिजने २ बाद १२२ अशी मजल मारली होती. त्यामुळे उर्वरित तीन षटकांत कूपर आणि डॉटिन मोठे फटके खेळून १६० धावांपर्यंत संघाला घेऊन जातील, असे वाटत होते. पण न्यूझीलंडची चाणाक्ष कर्णधार सुझी बेट्सने वेस्ट इंडिजचे इरादे ओळखत डिव्हानकडे चेंडू सुपूर्द केला आणि हे षटक वेस्ट इंडिजच्या मोठय़ा धावसंख्येच्या स्वप्नाला सुरुंग लावणारे ठरले.
वेस्ट इंडिजच्या कूपरने झंझावाती फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसे काढली होती. कर्णधार टेलर बाद झाल्यावर कूपरने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत फक्त डाव सावरला नाही तर संघाची धावगतीही चांगली ठेवली. तिच्या या खेळीमुळेच वेस्ट इंडिजला न्यूझीलंडपुढे १४४ धावांचे आव्हान ठेवता आले. कूपरने ४८ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६१ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला तिसऱ्या षटकात धक्का बसला. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या डिव्हानने दोन षटकांमध्ये चार चौकार लगावत धडाकेबाज सुरुवात केली. पण डिव्हान (२२) आणि कर्णधार बेट्स (१२) सात धावांच्या फरकाने तंबूत परतले आणि त्यांचा डाव अडचणीत सापडला. या धक्क्यानंतर सारा मॅघग्लाशन (३८) आणि अॅमे सॅटरवेट (२४) यांनी संघाला विजयासमीप नेण्याचा प्रयत्न केला खरा, पण टेलरने १७व्या षटकात दोघांना बाद करून संघासाठी विजयाचे दार उघडले.
संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : २० षटकांत ६ बाद १४३ (ब्रिटनी कूपर ६१, स्टेफनी टेलर २५; सोफी डिव्हान ४/२२) विजयी वि. न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १३७ (सारा मॅघग्लाशन ३८, अॅमे सॅटरवेट २४; स्टेफनी टेलर ३/२६).
सामनावीर : ब्रिटनी कूपर.