मेग लॅनिंग विजयाची शिल्पकार; इंग्लंडवर पाच धावांनी निसटता विजय
गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत, पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडवर निसटता विजय मिळवत सलग चौथ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग या विजयाची शिल्पकार ठरली.
इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. एलियास व्हिलानी आणि अलिसा हिली यांनी ४१ धावांची सलामी दिली. नताली शिव्हरने व्हिलानीला बाद करत ही जोडी फोडली. तिने १९ धावा केल्या. पाठोपाठ हिली २५ धावा करून तंबूत परतली. यानंतर मेग लॅनिंगने सामन्याची सूत्रे हाती घेतली. लॅनिंगने एलियास पेरीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. पेरी बाद झाल्यानंतरही लॅनिंगने अॅलेक्स ब्लॅकवेलच्या साह्य़ाने चौथ्या विकेटसाठी ३७ धावांची भागादारी रचत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. जेस जोनासन झटपट बाद झाली. जेनी गनच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत लॅनिंगने आपले अर्धशतक पूर्ण केले. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात लॅनिंग बाद झाली. तिने ५० चेंडूत ६ चौकारांसह ५५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने १३२ धावांची मजल मारली. इंग्लंडतर्फे नताली शिव्हरने सर्वाधिक २ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना चालरेट एडवर्ड्स आणि टॅमी ब्युमाऊंट यांनी ६७ धावांची भक्कम सलामी दिली. क्रिर्स्टन ब्रिम्सने चालरेटला ३१ धावांवर बाद केले. मेगन शूटने ब्युमाऊंटला ३२ धावांवर माघारी धाडले. सारा टेलरने २१ धावांचे योगदान दिले. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी सातत्याने विकेट्स गमावल्या. एकाही फलंदाजांला मोठी खेळी करता न आल्याने धावगतीचे आव्हान वाढत गेले. शेवटच्या षटकांत इंग्लंडला विजयासाठी १३ धावांची गरज होती. मात्र मेगन शूटने टिच्चून गोलंदाजी करताना केवळ सात धावा दिल्या आणि ऑस्ट्रेलियाने थरारक विजय साकारला. ऑस्ट्रेलियातर्फे मेगन शूटने २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ६ बाद १३२ (मेग लॅनिंग ५५, अलिसा हिली २५, नताली शिव्हर २/२२) विजयी विरुद्ध : २० षटकांत ७ बाद १२७ (टॅमी ब्युमाऊंट ३२, चालरेट एडवर्ड्स ३१, मेगन शूट २/१५)
सामनावीर : मेग लॅनिंग