दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट्सनी खळबळजनक विजय; जो रूट विजयाचा शिल्पकार
वेगात धावत असताना जो डोके शांत ठेवतो, तोच विजयी होतो हेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात जो रुटने दाखवून दिले. आफ्रिकेच्या २३० धावांचे लक्ष्य आणि समोर दर्जेदार गोलंदाज असतानाही ‘रूट’नीतीने इंग्लंडला दोन विकेट्सने विजय मिळवून दिला आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला क्विंटन डी’कॉक (५२) आणि हशिम अमला (५४) यांनी झंझावाती सुरुवात करून दिली. अमलाने ख्रिस जॉर्डनच्या पाचव्या षटकांमध्ये तब्बल २२ धावांची लूट करत आपले इरादे स्पष्ट केले. या दोघांनी फक्त सात षटकांमध्ये ९६ धावांची सलामी दिली. आफ्रिका आता तीनशे धावांचा टप्पा गाठणार, अशी भाकिते वर्तवली जात होती. पण डी’कॉकनंतर आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज ए बी डी’ व्हिलियर्स झटपट बाद झाला आणि त्यांच्या धावसंख्येला खीळ बसली. पण जे पी डय़ुमिनी (नाबाद ५४) आणि डेव्हिड मिलर (नाबाद २८) यांनी पाचव्या विकेटसाठी २७ चेंडूत ६० धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला २२९ धावा उभारून दिल्या.
इंग्लंडच्या २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेही धडाकेबाज सुरुवात केली. वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या दुसऱ्या षटकात इंग्लंडने २४ धावा लूटल्या. सलामीवीर जेसन रॉयने १६ चेंडूंत ४३ धावा करत विजयाचा पाया रचला आणि त्यावर सुरेख कळस चढवला तो जो रुटने. रुटने सामन्याची सूत्रे हाती घेतल्यावर इंग्लंडने ४५ चेंडूत शतक आणि ९९ चेंडूत द्विशतक फलकावर लावले. रुटने विजयाचा मार्ग रचताना ४४ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८३ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. रुट बाद झाल्यावर अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर इंग्लंडचे फलंदाज बाद झाल्याने सामना रंगदार झाला, पण मोइन अलीने चौथ्या चेंडूवर एकेरी धाव घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ४ बाद २२९ (हशिम अमला ५८, जे पी डय़ुमिनी नाबाद ५४, क्विंटन डी’कॉक ५२; मोईन अली २/३४) पराभूत वि. इंग्लंड : १९.४ षटकांत ८ बाद २३० (जो रूट ८३, जेसन रॉय ४३; कायले अ‍ॅबॉट ३/४१).
२३० : ट्वेन्टी-२० प्रकारातील धावांचा पाठलाग करतानाची दुसरी सर्वोच्च धावसंख्या. २०१५ मध्ये वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २३६ धावांचे आव्हान पेलले होते.

सामनावीर : जो रूट

Story img Loader