मुंबईत विंडीजविरुद्ध रहाणेला संधी मिळण्याची शक्यता
डाव्या पायाच्या दुखापतीची पर्वा न करता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युवराज सिंगने विराटसोबत डावाला स्थर्य देण्यासाठी उत्तम साथ दिली. मात्र त्याच्या दुखापतीचे स्वरूप पाहता वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तो खेळू शकला नाही, तर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेला घरच्या मैदानावर संधी मिळण्याची शक्यता आहे.
रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराटच्या साथीने एकेरी-दुहेरी धाव घेताना त्याला कठीण जात होते. त्याच्या खेळीदरम्यान दोनदा फिजियोला मैदानावर धाव घ्यावी लागली होती. मात्र तो हिमतीने खेळला. सोमवारी सकाळी भारतीय संघ चंदिगढहून मुंबईत दाखल झाला. मात्र चंदिगढ विमानतळावर मुळातच उशिरा पोहोचलेला युवी चालताना डावा पाय हळुवार टाकण्यावर भर देत होता. त्याची दुखापत ही भारतासाठी चिंताजनक ठरू शकेल, हेच यातून स्पष्ट होत होते. याबाबत धोनी म्हणाला, ‘‘युवराज सिंगचा विचार केल्यास त्याच्या दुखापतीचे स्वरूप पाहावे लागेल. २४ तासांत मी युवीच्या दुखापतीबाबत कदाचित योग्य मत देऊ शकेन. युवी आमच्यासोबत मुंबईला येत आहे. नेहमी आमच्यासोबत सराव करीत असल्यामुळे सामना खेळावा लागला तर तो नक्की खेळेल. फिजियोने जर युवराज खेळू शकणार नाही, हे स्पष्ट केले तर मात्र संघात बदल करावा लागेल.’’
युवराजची दुखापत चिंताजनक
रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराटच्या साथीने एकेरी-दुहेरी धाव घेताना त्याला कठीण जात होते.
Written by प्रशांत केणी
First published on: 29-03-2016 at 06:49 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuvraj singh injury is critical