देशातील काही शहरांमध्ये ५ जी सेवा सुरू झाली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल या दूरसंचार कपंन्या ५ जीचे जाळे संपूर्ण देशात पसरवण्याच्या तयारीत आहेत. ग्राहकाचा देखील ५ जी मोबाईल खरेदीकडे कल वाढला आहे. ५ जी कडे होणारी वाटचाल हेरून सायबर गुन्हेगार देखील या क्षेत्रात फसवणुकीचे नवनवे तंत्र अंमलात आणत आहेत. चेक पॉइंट सॉफ्टवेअरच्या अहवालानुसार, ऑनलाइन भामटे व्होडाफोन, एअरटेल आणि जिओचे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह असल्याचे सांगून लोकांना ४ जी सीम ५ जी मध्ये अपग्रेड करून देण्याच्या नावावर त्यांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत.
नवी फिशिंग पद्धत ग्राहकाला फिशिंगची लिंक पाठवून कार्य करते. लिंकद्वारे बँकेचे पासवर्ड आणि ओटीपी दिल्यानंतर खात्यातून पैसे चोरी होतात. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अशाच फसवणुकीबाबत माहिती दिली होती. यात सीम ५ जी मध्ये अपग्रेड करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून पैसे मागण्यात आले होते. त्यामुळे, अशा भामट्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
(व्हॉट्सअॅप वापरताना चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, अन्यथा खाते बंद होऊ शकते)
आततायीपणा करू नका, सावध राहा
बहुतेक कंपन्या विद्यमान सिमला ५ जी मध्ये अपग्रेड करत आहेत. ५ जी सेवा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे सिम बदलण्याची गरज नाही. ५ जी फोन सुरळीतपणे ५ जी सेवा देऊ शकेल यासाठी फोन कंपन्यांकडून अपडेट देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे आततायीपणा न करता, ऑलनालइन चोरट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.
मुंबई पोलिसांप्रमाणेच, पुणे, हैदराबाद आणि गुरुग्राम पोलिसांनी देखील या सायबर गुन्हेगारीबाबत सतर्क करणारे मेसेज टाकले आहेत. कोणत्याही टेलिमार्केटरला आपली वैयक्तिक किंवा बँकेशी संबंधित माहिती किंवा ओटीपी देऊ नये, असे केल्याने तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, असे सतर्कतेचे आवाहन देशभरातील अधिकाऱ्यांकडून नागरिकांना केले जात आहे.
(लाँच होताच GOOGLE PIXEL 7 PRO मध्ये आढळली ‘ही’ मोठी समस्या, घ्यायचे की नाही? अहवाल वाचूनच ठरवा)
चेक पॉइंटने दिला हा सल्ला
अशा प्रकारची फसवणूक वाढत असल्याने चेक पॉइंट सॉफ्टवेअरने काही उपाय सुचवले आहेत. मजबूत पासवर्ड ठेवा, अतिरिक्त सुरक्षा स्तरासाठी टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन सुरू करा, फिशिंगची लक्षणे ओळखा आणि नव्या सुरक्षा पॅचसह सॉफ्टवेअर अपडेट करा, असे उपाय सुचवले आहेत.