भारताने 5G च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. 5G ची प्रतीक्षा आता संपणार आहे. अवघ्या काही वेळात, 4G वरून अपग्रेड केल्यानंतर, आपण 5G सेवेपर्यंत पोहोचू. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर होणाऱ्या द इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये शनिवार, १ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 5G सेवेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील दोन शहरांसह देशातील १३ शहरांतही 5G चं सुपरफास्ट नेटवर्क मिळणार आहे.
युजर्सला मिळणार ‘हे’ फायदे
5G सेवा सुरू केल्यानंतर, युजर्सचा अनुभव खूप बदलणार आहे. जसे 4G ने युजर्सचे जग क्षणार्धात बदलून टाकले होते. त्याचप्रमाणे 5G आल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. इंटरनेट स्पीड दहा पट वाढवण्याचा सर्वात मोठा फायदा होईल. याचा फायदा असा होईल की बफरिंगपासून सुटका होईल. याशिवाय व्हॉट्सअॅप कॉलमधील व्यत्ययही संपणार आहे. चित्रपट १०-१५ सेकंदात डाउनलोड होईल. व्हर्च्युअल रियल्टी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवेल. गेमिंग जग बदलेल. तसेच दुर्गम भागात शैक्षणिक सेवा आणि आरोग्य सेवा पोहोचणे सोपे होणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात ड्रोन आदींचा वापर करणे सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे Metaverse सारख्या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्षात होईल.
आणखी वाचा : ‘Jio Phone 5G’ : किंमत झाली लीक; आणखी जाणून घ्या बरंच काही…
महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांचा समावेश
दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील पहिल्या टप्प्यात दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ, बंगळुरू, कोलकाता, चंदीगड, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, गांधी नगरसह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, या दोन शहरांतील लोकांनाही सर्वात आधी या 5G सुविधेचा लाभ मिळणार आहे.