इलेक्ट्रिक गॅझेट बनवणाऱ्या कंपन्यांपाठोपाठ आता नेटवर्क कंपन्यांमध्येही चढाओढ पाहायला मिळत आहे. देशभरात मोबाईल नेटवर्कचं जाळं घट्ट करण्यासाठी कंपन्या काम करत आहे. तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अद्यावत सुविधा देत आहेत. देशातील तिसऱ्या क्रमांकावरील दूरसंचार ऑपरेटर व्होडाफोन आयडियाने पुण्यात 5G ची चाचणी केली. यादरम्यान, कंपनीने 4.1Gbps (गीगाबाइट्स प्रति सेकंद) वेग गाठला. या वेगाची चाचणी 26 GHz स्पेक्ट्रमवर करण्यात आली. व्होडाफोन आयडिया सध्या आपले नेटवर्क मजबूत करण्यावर भर देत आहे. आगामी काळात आपले नेटवर्क चांगले असेल असा विश्वास कंपनीला आहे. 5G च्या वापरामुळे लोकांना आरोग्य, शिक्षण, कृषी, खेळ आणि इतर क्षेत्रातील सुविधा सहज मिळतील.
“चाचणी दरम्यान आम्हाला 4.1Gbps चा वेग मिळाला. कंपनीला 5G चाचण्यांसाठी पुणे, महाराष्ट्र आणि गांधीनगर मिळाले आहे. गांधीनगरमध्ये नोकिया आणि पुण्यात एरिक्सनसोबत चाचण्या केल्या आहेत.”, असं व्होडाफोन आयडियाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जगबीर सिंग यांनी सांगितलं. “सरकारने 5G चाचणी सहा महिन्यांसाठी वाढवली आहे. ही मुदत मे २०२२ पर्यंत किंवा स्पेक्ट्रमच्या लिलावापर्यंत वाढवण्यात आली आहे. जे काही लवकर होईल, त्या तारखेपर्यंत कंपनी चाचणी करू शकते.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
“5G चा वापर करून, वैद्यकीय सुविधा, क्लाउड गेमिंग, सार्वजनिक सुरक्षा, आपत्कालीन सेवा देशातील दुर्गम भागात सुलभ करता येऊ शकते. 5G आल्यानंतर सर्व काही सोपे होईल. कारण 4G च्या गतीने गोष्टी इतक्या वेगाने कव्हर करता येत नाहीत.”, असं व्होडाफोन इंडियाने चाचणीदरम्यान सांगितले.