Blue Aadhaar card: भारतीय नागरिकांचे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजे ‘आधार कार्ड.’ अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, बँकेतील महत्त्वाचे काम, नवीन मोबाइल सिम घेणे आदी गोष्टींसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा उपयोग करण्यात येतो. तुम्ही अनेकदा ब्ल्यू (निळ्या रंगाचे) आधार कार्डबद्दल नक्कीच ऐकलं असेल. ब्ल्यू (निळ्या रंगाचे) आधार कार्ड म्हणजे बाल आधार कार्ड. हे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असते. प्रौढांसाठी जारी केलेल्या नियमित आधार कार्डांपेक्षा हे थोडं वेगळं आहे. हे आधार कार्ड निळ्या रंगाचे असते, म्हणून याला ब्ल्यू आधार कार्ड म्हटले जाते. तसेच हे आधार कार्ड लहान मुलं पाच वर्षांची होईपर्यंत वैध असते. यानंतर त्यांची बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे आवश्यक आहे, जे कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर केले जाऊ शकते. तर तुम्हालादेखील तुमच्या मुलाचे ब्ल्यू आधार कार्ड काढायचे असेल तर ब्ल्यू आधार कार्ड म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय व अर्जाची प्रक्रिया याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.
ब्ल्यू (निळे) आधार कार्ड कसे काम करते?
ब्ल्यू आधार कार्ड जारी करण्यासाठी मुलाच्या बायोमेट्रिक डेटाची आवश्यकता नाही. पालकांच्या युआयडी (UID) शी जोडलेला (लिंक) फोटो आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती यांच्या आधारे ही प्रक्रिया केली जाते.
ब्ल्यू आधार कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो?
जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटलच्या डिस्चार्ज स्लिपचा वापर करून पालक नवजात बाळाच्या ब्ल्यू आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. तसेच पालक शाळकरी विद्यार्थ्यांचे ब्ल्यू आधार कार्ड काढण्यासाठी मुलांच्या शाळेचा आयडीदेखील वापरू शकतात.
ब्ल्यू आधार कार्ड असणं का महत्त्वाचे आहे?
ब्ल्यू आधार कार्ड सरकारी सहाय्य कार्यक्रम आणि ईडब्ल्यूएस शिष्यवृत्तीच्या तरतुदीसाठी उपयोगी आहे. अनेक शाळांमध्ये तर आता विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान ब्ल्यू आधार कार्ड सादर करणे बंधनकारक केले आहे.
हेही वाचा…OnePlusची नवीन घोषणा! ‘Watch 2’ ची दाखवली पहिली झलक; होणार ‘या’ दिवशी लाँच
ब्ल्यू (निळ्या रंगाचे) आधार कार्डसाठी नोंदणी (Register) कशी करावी?
- युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या वेबसाईटवर जा. तिथे आधार कार्ड नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) असा पर्याय असेल, तो निवडा.
- येथे तुमच्या मुलाचे/मुलीचे नाव, पालकांचा फोन नंबर आणि नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) अपॉइंटमेंट स्लॉट निवडा.
- नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी तुमच्या जवळचे आधार नाव नोंदणी केंद्र बुक करा. तसेच पालकांनी स्वतःचे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि मुलाचे जन्म प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह नोंदणी केंद्राला भेट द्यावी.
- त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू होईल.
- कागदपत्र पडताळणीनंतर ६० दिवसांच्या आत तुमच्या मुलाच्या नावावर ब्ल्यू आधार कार्ड जारी केले जाईल. अशाप्रकारे पालक त्यांच्या पाच वर्षांखालील मुलांसाठी ब्ल्यू आधार कार्ड काढू शकणार आहेत.