सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने २ सप्टेंबर २०२३ रोजी आदित्य एल-१ हे अवकाशयान अंतराळात पाठवलं. मागील १७ दिवसांपासून हे अवकाशयान पृथ्वीच्या कक्षेत घिरट्या घेत होतं. दरम्यान, आदित्य एल-१ ने मंगळवारी (१८ सप्टेंबर) मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून पृथ्वीचा निरोप घेतला. आदित्य एल-१ हे यान आता सूर्याच्या दिशेने रवाना झालं आहे.
‘आदित्य’ला अंतराळातील एल-१ या बिंदूपर्यंत प्रवास करायचा आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान हा असा बिंदू आहे जिथून आदित्य एल-१ हे यान सूर्यावर लक्ष ठेवणार आहे. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवण्यात आलं आहे. एल-१ बिंदूजवळ पोहोचल्यावर हे अवकाशयान इस्रोला सूर्याची माहिती देत राहील.
आदित्य एल-१ या अवकाशयानाने पृथ्वीभोवती चार वेळा कक्षा बदलली आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाच्या पलीकडे गेलं आहे. हे यान एल-१ बिंदूवर पोहोचल्यानंतर इस्रोला प्रभामंडळाचा अभ्यास करता येईल. त्यानंतर सौरमोहिमेच्या संपूर्ण कालावधीसाठी हे अवकाशयान तिथेच राहील. एल-१ पॉईंट म्हणजेच लँग्रेज पॉईंट. प्रसिद्ध इटलियन-फ्रेंच गणितज्ज्ञ जोसेफ लुई लँग्रेज यांच्या नावाने या बिंदूला एल-१ पॉईंट असं नाव देण्यात आलं आहे.
दरम्यान, आदित्य एल- १ ने आता वैज्ञानिक डेटा (माहिती) गोळा करण्यास सुरुवात केल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. STEPS उपकरणाच्या सेन्सर्सने पृथ्वीपासून ५०,००० किमी पेक्षा जास्त अंतरावरील सुप्रा-थर्मल, आयॉन्स आणि इलेक्ट्रॉन मोजण्यास सुरुवात केली आहे. हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांविषयी विश्लेषण करण्यास मदत करेल, असे इस्रोने सोमवारी सांगितले. १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ५०,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर STEPS सक्रिय करण्यात आले. हे अंतर पृथ्वीच्या रेडिएशन बेल्ट क्षेत्राच्या पलीकडे ठेवून पृथ्वीच्या त्रिज्येच्या (रेडियसच्या) आठ पटीने जास्त आहे. आता हे यान ९० हजार किलोमीटरहून पुढे गेलं आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, स्टेप्सच्या सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्यानंतर, अंतराळयान पृथ्वीपासून ५०,००० किलोमीटर पुढे जाईपर्यंत डेटा गोळा करणे चालूच होते. स्टेप्सचे प्रत्येक युनिट सुरळितपणे काम करत असल्याचं इस्रोने सांगितलं आहे.
ह ही वाचा >> महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मत्रिमंडळाची मंजुरी, आज लोकसभेत मांडण्याची शक्यता
STEPS म्हणजे काय?
स्टेप्स हे सुप्रा थर्मल आणि एनर्जेटिक पार्टिकल स्पेक्ट्रोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे, जे आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (ASPEX) पेलोडचा एक भाग आहे. स्टेप्समध्ये एकूण सहा सेन्सर्स आहेत, प्रत्येक सेन्सर वेगवेगळ्या दिशेने निरीक्षण करतो, सुप्रा-थर्मल आणि आयन मोजतो. कमी आणि उच्च-ऊर्जा कण स्पेक्ट्रोमीटर वापरून हे मोजमाप केले जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या उपस्थितीत असलेल्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेदरम्यान गोळा केलेला डेटा शास्त्रज्ञांना मदत करणार आहे.”