Aditya L1 Mission Update: रविवारी १५ ऑक्टोबरला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त रामेश्वरममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोमनाथ यांनी भेट दिली होती. यावेळी सोमनाथ यांनी इस्रोच्या महत्त्वकांक्षी आदित्य एल १ उपक्रमाच्या प्रगतीविषयी माहिती दिली आहे. सूर्याचा अभ्यास करण्याच्या प्रयत्नात इस्रोने धाडलेले आदित्य एल-१ मोहिमेतील अंतराळयान हे सुस्थितीत आहे असे सोमनाथ यांनी सांगितले.
पृथ्वीपासून सूर्याच्या एल-१ पॉईंटपर्यंतचा प्रवास जवळपास ११० दिवसांचा आहे. काही दिवसांपूर्वीच टीमकडून यानाचा मार्ग तपासून त्यात थोडे बदल करण्यात आले आहेत. L1 बिंदूवर पोहोचण्यासाठी परिस्थितीनुसार बदल व सुधारणा करण्यासाठी ट्रॅकिंग केले जात आहे. यातच आम्हाला आढळले की यान आता L1 पॉइंटच्या दिशेने योग्य दिशेने जात आहे व साधारण जानेवारी २०२४ च्या मध्यात आदित्य एल- १ मोहिमेचा शिलेदार सूर्याच्या कोरोनातील एल- १ पॉइंटवर पोहोचणार आहे. अजून ७० ते ७५ दिवसात प्रवासामार्गात होणाऱ्या प्रगतीवर आम्ही लक्ष ठेवून असू.
एकदा यान एल-१ पॉईंटवर पोहोचले की त्यानंतर उपकरणे सुरु होतील आणि डेटा स्ट्रीमिंग करण्यास सुरवात होईल. सध्या, आदित्य L1 पूर्णतः योग्य स्थितीत आहे. इस्रोने २ सप्टेंबर रोजी आदित्य-L1 अवकाशात प्रक्षेपित केले होते. पृथ्वीपासून अंदाजे १.५ दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या पहिल्या सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्गियन पॉइंट (L1) भोवतीच्या कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणे या मोहिमेचे उद्दिष्ट्य आहे.
हे ही वाचा<< चांद्रयान- ३ च्या वेळी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांना नासाने दिली होती ‘ही’ ऑफर! उत्तर वाचून वाटेल अभिमान
दुसरीकडे यावेळी माध्यमांशी संवाद साधताना एस. सोमनाथ यांनी चांद्रयान ३ च्या विक्रम लॅण्डरविषयी सुद्धा अपडेट दिला. विक्रम सध्या चंद्रावर आनंदाने झोपी गेला असून जर भविष्यात तो कधी जागा होऊ इच्छित असेल तर होईल, तोपर्यंत आपण वाट पाहू असे इस्रो प्रमुख म्हणाले. येत्या काळात भारत नव्याने बुध, शुक्र व पुन्हा एकदा चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुद्धा सोमनाथ यांनी सांगितले.