सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’चं आदित्य एल-१ हे अवकाशयान गेल्या आठवड्यात (२ सप्टेंबर) आकाशात झेपावलं. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा, म्हणजेच सूर्य प्रभामंडळाचा (करोना) अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळी उपकरणं (पेलोड) बसवण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम, सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, ओझोनचा थर आणि अंतराळातील हवामान या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने ही मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, आदित्य एल-१ या अवकाशयानाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. इस्रोने याबाबतची माहिती शेअर केली आहे. लाँचिंगनंतर चार दिवसांनी म्हणजेच आज (५ सप्टेंबर) सकाळी इस्रोने एक ट्वीट करून सांगितलं की, आदित्य एल-१ ने दुसऱ्यांदा यशस्वीपणे त्याची कक्षा (ऑर्बिट) बदलली आहे. आदित्य एल-१ ची कक्षा बदलण्याच्या ऑपरेशनदरम्यान बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमधून उपग्रहांद्वारे इस्रोच्या या अवकाशयानाचा मागोवा घेण्यात आला.
आदित्य एल-१ हे अवकाशयान आधी २४५ किमी X २२४५९ किमी कक्षेतून जात होतं. या यानाने आता त्याची कक्षा बदलून ते २८२ किमी X ४०२२५ किमी या कक्षेतून पुढे सरसावत आहे. आदित्य एल-१ मोहिमेतलं हे इस्रोचं दुसरं यश आहे. आता १० सप्टेंबर २०२३ रोजी आदित्य एल-१ हे यान तिसऱ्यांदा त्याची कक्षा बदलेल.
भारताच्या सौरमोहिमेच्या आराखड्यानुसार आदित्य एल-१ ला पृथ्वीभोवती १६ दिवस फिरायचं आहे. त्यानंतर तो सूर्याच्या दिशेने जाणाऱ्या कक्षेत प्रवेश करेल आणि वेगाने सूर्याकडे झेपावेल. ‘आदित्य’ला अंतराळातील एल-१ या बिंदूपर्यंत जायचं आहे. कारण हे अवकाशयान ‘एल १’ च्या अभ्यासासाठी पाठवलं आहे. ‘एल-१’ हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधील एक बिंदू आहे. तिथपर्यंत हे यान जाणार आहे. हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर दूर आहे. म्हणजे आदित्य एल-१ यानाला तब्बल १५ लाख किलोमीटरपर्यंतचा प्रवास करायचा आहे. यासाठी आदित्यला चार महिने लागणार आहेत.
भारताची सौरमोहीम कशी असेल?
पीएसएलव्हीच्या मदतीने उड्डाण केल्यानंतर आता काही दिवस आदित्य एल-१ हे अंतराळयान पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करेल. मंगळयान किंवा चांद्रयानाप्रमाणेच त्याची कक्षा वाढवली जाईल. सातत्याने नवनव्या (पुढच्या) कक्षा बदलत हे यान पुढे सरकत राहील. एखाद्या गोफणीप्रमाणे हे यान त्याच्या कक्षा बदलत जाईल. काल मध्यरात्री आदित्य एल-१ ने दुसऱ्यांदा त्याची कक्षा बदलली. त्यानंतर सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणांच्या मदतीने हे यान सूर्याच्या दिशेने प्रवास करेल. सुमारे १५ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर भारताचं हे यान ‘एल-१’ या बिंदूपाशी पोहोचेल. या संपूर्ण प्रक्रियेला १२५ दिवसांचा कालावधी लागेल.