भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची ( ISRO ) चांद्रयान ३ मोहीम सध्या चर्चेत आहे आणि त्याच्या अपडेटनुसार हे यान चंद्रभोवती १५० ते १७७ किलोमीटर अशा वर्तुळाकार कक्षेत सध्या फिरत आहे. येत्या २३ ऑगस्टला हे यान चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.
असं असतांना इस्रोची आणखी एक मोहीम जगाचे लक्ष वेघून घेणार आहे. ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो Aditya L1 हे यान पाठवणार आहे. अर्थात हे यान सूर्याच्या जवळ जाणार नसून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावरुन सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. या अंतरावरुन ते कुठलाही अडथळा ने येता अविरत पणे सूर्याचा अभ्यास करणार आहे.
हेही वाचा… एलॉन मस्क यांनी X वर बॅन केले तब्बल २३ लाख भारतीय अकाउंट्स, ‘हे’ आहे कारण
Aditya L1 कसे आहे?
इस्रोच्या PSLV या अत्यंत भरवशाच्या प्रक्षेपकाद्वारे या यानाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. यानाचे वजन सुमारे एक हजार ४७५ किलो असून त्यावरील विविध सात वैज्ञानिक उपकरणांचे वजन हे २४४ किलो आहे. यानाचा कार्यकाल पाच वर्ष एवढा नियोजीत केला आहे. मोहीमेचा खर्च हा सुमारे ३८० कोटी एवढा आहे.
हेही वाचा… Tech Tips: तुमच्या मोबाइलची बॅटरी कशी सेव्ह करायची? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स
L1 काय आहे?
सूर्याला विविध नावांनी ओळखले जाते. त्यापैकी एक नाव म्हणजे आदित्य. तेव्हा सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या यानाला हेच नाव देण्यात आले आहे. पण या नावाच्या पुढे L1 असंही म्हटलं गेलं आहे. तेव्हा L1 म्हणजे काय?. सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती ही मोठी आहे. पृथ्वी आणि सूर्याच्यामध्ये अवकाशात ढोबळपणे पाच पॉईंट किंवा ठिकाणे ही संशोधकांनी निश्चित केली आहे की ज्या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांची गुरुत्वाकर्षण शक्ती ही समसमान आहे. या जागांना L1, L2, L3…. अशी नावे देण्यात आली आहेत. तेव्हा आदित्य यान हे L1 जागी असेल आणि ते सूर्याभोवती भ्रमण करणार आहे. L1 ही जागा सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये असून पृथ्वीपासून या स्थानाचे अंतर हे सुमारे १५ लाख किलोमीटर एवढे आहे.
हेही वाचा… तुमचंही Gmail स्टोरेज फुल्ल झालंय? टेन्शन घेऊ नका , ‘या’ ट्रिक्स येतील कामी
सूर्याचा कोणता अभ्यास केला जाणार आहे?
गेली अनेक वर्षे सूर्याचा पृथ्वीवरुन विविध शक्तीशाले दुर्बिणींद्वारे अभ्यास केला जात आहे, अवकाशात पृथ्वीपासून काही अंतरावर तर सूर्याच्या भोवती यान पाठवतही सूर्याबद्दल अधिकाधिक माहिती गोळा केली जात आहे. आदित्य L1 वर सात विविध उरकरणे आहेत. याद्वारे सूर्यावरील विविध थरांचे वातावरण, वातावरणाच्या तापमानातील चढ-उतार, सूर्यापासून निघणारे उर्जाभारित कण, सूर्याभोवती असलेले चुंबकीय क्षेत्र, सुर्यावरील सौर वादळे यांचा अभ्यास केला जाणार आहे.