लोकप्रिय लाइव्ह व्हिडीओ कॉल साईट ‘ओमेग्ले’ (Omegle) यांनी आपली सेवा बंद केली आहे. ओमेग्ले या प्लॅटफॉर्मवर ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींबरोबर संदेश किंवा व्हिडीओ कॉल यांच्यामार्फत संवाद साधला जायचा. जगप्रसिद्ध चॅटिंग प्लॅटफॉर्म ‘ओमेग्ले’ने अचानक आपली सेवा बंद केली आहे. या प्लॅटफॉर्मचे संस्थापक लेईफ के-ब्रूक्स (Leif K-Brooks) हे आहेत. त्यांनी अचानकपणे ८ नोव्हेंबर २०२३ रोजी म्हणजेच काल ही वेबसाइट बंद करण्यात आल्याचे सांगितले आहे.
कोरोनाच्या काळात हा प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांची संख्या वाढली. तसेच याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे प्लॅटफॉर्म चालवणारे संस्थापक लेईफ के-ब्रूक्स यांनी हा प्लॅटफॉर्म चालवणं आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या शक्य होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे आणि ही वेबसाइट बंद केली. त्यामुळे १४ वर्षांनंतर त्यांनी ‘ओमेग्ले’ हा प्लॅटफॉर्म बंद करण्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे.
हेही वाचा…घाई करा! दिवाळी ॲमेझॉन सेलचा शेवटचा दिवस; कमी किमतीत मिळणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन्स…
प्लॅटफॉर्मचे संस्थापक लेईफ के-ब्रूक्स यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. “मी १८ वर्षांचा असताना ओमेग्ले ही वेबसाईट लाँच केली होती. तेव्हा मी माझ्या आई-वडिलांसोबतच राहत होतो. इंटरनेटमुळे हे जग एक ग्लोबल व्हिलेज झाल्याचं आपण म्हणतो. एखाद्या गावातून फिरताना जसे आपल्याला लोक अचानक भेटतात, त्याच प्रकारे या ग्लोबल व्हिलेजमध्ये फिरताना इतरांना भेटता यावं यासाठी ओमेग्ले ही वेबसाइट काम करीत होती, असे लेईफ म्हणाले. दुर्दैवानं चांगल्या गोष्टी कायम टिकत नाहीत. ‘ओमेग्ले’चा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे सगळं असताना प्लॅटफॉर्म चालवणं आता मला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. माझ्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे आणि मला वयाच्या तिसाव्या वर्षीच हृदयविकाराचा झटका नको आहे,” असे लेईफ के-ब्रूक्स म्हणाले आहेत.
तसेच ज्यांनी ‘ओमेग्ले’ प्लॅटफॉर्मचा वापर सकारात्मतक हेतूंसाठी केला आणि ज्यांनी या वेबसाइटच्या यशात आपलं योगदान दिलं त्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो. मला माफ करा की, मी तुमच्यासाठी ही लढाई लढू शकलो नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ओमेग्ले प्लॅटफॉर्मचा २००९-२०२३ हा प्रवास लिहून खाली एक पत्र लिहिले आहे; ज्यात या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.