बंगळूरु :‘चांद्रयान-३’च्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ची (इस्रो) पहिली सौरमोहीम सुरू होणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य- एल१’ या यानाचे प्रक्षेपण शनिवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता होणार असल्याचे ‘इस्रो’ने सोमवारी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या ‘एल-१’ या बिंदूभोवती परिभ्रमण करून हे यान सूर्याचा अभ्यास करेल. सूर्याच्या सर्वात वरील आवरणाचा म्हणजे कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी यानामध्ये सात विविध उपकरणे बसविण्यात आली आहेत. सौरवादळांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम तपासण्याचे महत्त्वपूर्ण काम या मोहिमेतून केले जाणार आहे. सूर्याचा पृष्ठभाग ६००० अंश सेंटीग्रेडवर असताना कोरोनाचे तापमान सुमारे एक दशलक्ष अंशापर्यंत कसे पोहोचते, याबाबतची माहिती मिळविण्याचे कामही होणार आहे.

हेही वाचा >>> Chandrayaan-3 : …अन् प्रज्ञान रोव्हरच्या वाटेत भला मोठा खड्डा आला, इस्रोने जारी केले नवीन फोटो

एल-१म्हणजे काय?

अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये (तारे, ग्रह, उपग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल (बॅलन्स) असते. अशा बिंदूंना ‘लँगरेंज पॉइंट’ म्हटले जाते. सूर्य आणि पृथ्वीशी संबंधित असलेला एल-१ हा बिंदू आहे.

पुण्यातील आयुकाचा सहभाग

‘आदित्य एल-१’ ही मोहीम संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. देशभरातील विविध संस्थांनी तयार केलेली उपकरणे यानावर बसविण्यात आली आहेत. पुण्यातील ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेने तयार केलेल्या ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (एसयूआयटी) पेलोड विकसित केला आहे. याखेरीज बंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयआयए) संस्थेने विकसित केलेला ‘व्हिजिबल एमिशन लाइन करोनाग्राफ’ (व्हीईएलसी) हे उपकरणही यानावर असेल.

मोहिमेची चार प्रमुख उद्दिष्टे

* सूर्याच्या बाह्यपृष्ठाचे तापमान आणि सौरवादळांची स्थिती अभ्यासणे

* सूर्यावरील वातावरणाचा तुलनात्मक अभ्यास

* सौरवाऱ्यांची दिशा, तापमानातील फरक अभ्यासणे.

* सौरवादळांचा पृथ्वीवर होणारा परिणाम

‘प्रज्ञान’ने खड्डा चुकवला.. 

‘चांद्रयान-३’ मोहिमेतील ‘प्रज्ञान’ रोव्हरच्या मार्गात मोठा खड्डा (पहिले छायाचित्र) आला. त्यानंतर त्याला मार्ग बदलण्याची सूचना करण्यात आली व रोव्हर दुसऱ्या मार्गावरून (दुसरे छायाचित्र) मार्गस्थ झाला.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After success of chandrayaan 3 isro to begin first solar mission zws
Show comments