Ram Mandir Ayodhya : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अगदी उत्साहात सुरू आहे. २२ जानेवारीला मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यानिमित्त देशभरातील अनेक रामभक्त या खास सोहळ्यासाठी अयोध्येत उपस्थिती लावतील. तसेच श्रीराम मंदिरातील अभिषेक सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष म्हणजे भारत आणि परदेशातील अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे यादरम्यान सुरक्षेची काळजी घेण्यासाठीसुद्धा खास सोय करण्यात येणार आहे.
लखनौ विभागाचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) पीयूष मोरडिया यांनी एएनआयला सांगितले की, पोलीस प्रशासनाने शनिवारी आगामी ‘प्राणप्रतिष्ठा’ (अभिषेक) सोहळ्यासंदर्भात श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांच्यासमवेत बैठक घेतली आणि कार्यक्रमाची पद्धतशीर माहिती मिळवली. तसेच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या बैठकीत निश्चित झालेली एक महत्त्वपूर्ण माहिती सांगितली.
श्रीराम मंदिर परिसरात एआय तंत्रज्ञानाने युक्त असलेला सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच एआयवर आधारित कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या हायटेक कॅमेऱ्यांद्वारे शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीची तपासणी झाल्याशिवाय ती मंदिराजवळ जाऊ शकणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी चेकिंग पॉइंट उभारण्यात येणार आहेत आणि काही संशयास्पद दिसल्यास वेळोवेळी अलर्ट केले जाईल.
अयोध्येत १४ ते २२ जानेवारीदरम्यान अमृतमहोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अयोध्येत असंख्य तंबूयुक्त शहरे उभारली जात आहेत आणि श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने १० ते १५ हजार लोकांसाठी व्यवस्था केली आहे. भव्य समारंभाला उपस्थित राहणाऱ्यांसाठी अयोध्येत पोलीस कुमक तैनात करण्यात येणार आहे; जेणेकरून यात्रेकरूंना कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करून घेतली जाईल. तसेच श्रीराम मंदिर आणि तंबूयुक्त शहरांच्या आसपासच्या भागांसह संपूर्ण जिल्ह्यात एआय सक्षम सीसीटीव्ही लावण्यात येतील.