आपल्या प्रत्येकाचे बँकेमध्ये अकाउंट असते. काही जणांचे एकापेक्षा अधिक बँकांमध्ये अकाउंट्स असतात. बचत आणि चालू खाते असे दोन प्रकार यामध्ये असतात. आपल्या बँकेतले पैसे काढण्यासाठी चेक, ATM , आणि अन्य पर्यायांचा वापर करावा लागतो. मात्र तुम्ही आधार क्रमांक आणि चेहरा दाखवून बँकेतून पैसे काढू शकलात तर ? आज आपण असच एक बँकेविषयी जाणून घेणार आहोत.
जर का तुमचे अकाउंट हे Airtel Payment बँकेत असेल तर लवकरच तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि तुमचा चेहरा दाखवून बँकेतून पैसे काढू शकता. एअरटेल पेमेंट्स बँकेने यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी (NPCI ) शी पार्टनरशिप केली आहे. तसेच बँकेशी जोडलेल्या पेमेंट सर्व्हिससाठी ऑथेंटिकेशन सुरू केले आहे. एअरटेल पेमेंट बँक ही अशी सेवा देणारी देशातील चौथी बँक ठरली आहे.
दरम्यान, NPCI ची आधार पेमेंट सिस्टीमद्वारे लोकांना आधार कार्ड क्रमांक आणि व्हर्च्युअल आयडीच्या मदतीने कोणत्याही बँक पॉईंटवर व्यवहार किंवा नॉन फायनान्शिअल अॅक्टिव्हिटी करता येते. आतापर्यंत, ग्राहकांना एअरटेल बँकेत पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक, फिंगरप्रिंट किंवा Eye व्हेरिफिकेशन करावे लागत होते. मात्र आता ग्राहकांना आणखी एक सुविधा मिळणार असून ते आधार क्रमांक आणि त्यांच्या चेहऱ्याच्या मदतीने व्यवहार करू शकणार आहेत. ज्यांचे बोटांचे ठसे अनेकदा जुळत नाहीत अशा लोकांना या सुविधेचा फायदा होणार आहे.

एअरटेल पेमेंट्स बँक सुरुवातीला आधार फेस ऑथेंटिकेशनद्वारे नॉन फायनान्शिअल व्यवहारांना परवानगी देईल. जसे की तुम्ही याच्या मदतीने मिनी स्टेटमेंट आणि बँक बॅलन्स इत्यादी तपासू शकता. दुसऱ्या टप्प्यात लोकांना व्यवहारांशी संबंधित असलेल्या सेवा उपलब्ध होऊ शकतात. NPCI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एअरटेल पेमेंट बँक त्यांच्या बँकेतील इतर बँकांच्या ग्राहकांनाही ही सुविधा देऊ शकणार आहे ही यामधील सर्वात महत्वाची गोष्ट आहे.