Jio, Airtel and Vi Voice and SMS Plan : आपल्यातील अनेकांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये वायफाय हा असतो. मोबाईल डेटापेक्षा वायफायवर झटपट कामे होतात. म्हणून आपण सहसा वायफाय लावण्याला प्राधान्य देतो. कारण- जास्त एमबी म्हणजे जास्त खर्चाचा रिचार्ज प्लॅन. त्यामुळे हे लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI)ने युजर्सना महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे आणि काही दिवसांपूर्वी टेलिकॉम कंपन्यांना फक्त व्हॉईस आणि एसएमएस रिचार्ज प्लॅन (Voice and SMS Plan) लाँच करण्याचे आदेश दिले होते. डेटा न वापरणाऱ्या युजर्सना याचा फायदा होऊ शकेल, असा त्यामागचा हेतू होता. जिओ, एअरटेल व व्हीआयच्या या निर्णयाचा फायदा त्या युजर्सना होणार आहे, जे फक्त कॉलिंग आणि एसएमएस सेवा वापरतात.
ट्रायच्या या नियमानंतर आता जिओ, एअरटेल व व्हीआयनेसुद्धा कॉलिंग आणि एसएमएससह रिचार्ज प्लॅन (Voice and SMS Plan) आणले आहेत…
जिओ व्हॉइस प्लॅन (Jio Voice and SMS Plan)
जिओने ४५८ रुपये आणि १९५९ च्या किमतीच्या दोन बजेट-फ्रेंडली व्हॉईस प्लॅनचे लाँच केले आहेत. तर, ४५८ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता देतो, ज्यामध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि १००० मोफत एसएमएसचा समावेश आहे. दुसरीकडे जिओचा १९५८ रुपयांचा प्लॅन ३६५ दिवसांची वैधता, ३,६०० मोफत एसएमएससह तुम्ही वर्षभर सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगच्या सुविधेचा आनंद घेऊ शकता.
एअरटेल व्हॉइस प्लॅन (Airtel Voice and SMS Plan)
एअरटेलनेसुद्धा ग्राहकांसाठी दोन व्हॉईस प्लॅन लाँच केले आहेत. त्यामध्ये एक ५०९ आणि दुसरा १९९९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. ५०९ रुपयांच्या प्लॅनवर सर्व नेटवर्कवर ८४ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि ९०० मोफत एसएमएससह दिले जात आहेत. तर १९९९ च्या प्लॅनसाठी, एअरटेल संपूर्ण वर्षाची वैधता प्रदान करतो आहे. याचा अर्थ तुम्हाला वर्षभर रिचार्ज करण्याची चिंता नाही. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि ३,६०० मोफत एसएमएसचा समावेश आहे.
व्हीआय व्हॉइस प्लॅन (Vi Voice and SMS Plan)
जिओ, एअरटेलनंतर व्हीआयसुद्धा ग्राहकांसाठी व्हॉइस प्लॅनसह मैदानात उतरले आहे. वोडाफोन आयडिया (Vi)ने फक्त १४६० रुपयांचा एकच प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन २७० दिवसांची वैधता देतो, सर्व नेटवर्कवर अमर्यादित विनामूल्य कॉल आणि २७० दिवस १०० विनामूल्य एसएमएस दिले जाणार आहेत. एकूणच जिओ, एअरटेल व व्हीआयचे हे व्हॉइस प्लॅन्स युजर्सना डेटाच्या अतिरिक्त खर्चाशिवाय कॉलिंग सेवा आणि एसएमएस सेवा पुरवण्यास मदत करतील .