लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होतील. या सुट्ट्यांमध्ये अनेकजण मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जाण्याची योजना आखतात. यासाठी काही दिवस आधीपासूनच प्लॅनिंग सुरू होते. फिरायला जाण्याची जागा, तेथील राहण्याची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था करणे अशा बऱ्याच गोष्टींची तयारी करायची असते. रोजच्या कामाच्या व्यापातून ब्रेक घेऊन मित्र किंवा कुटुंबाबरोबरचा हा वेळ अविस्मरणीय असावा असे प्रत्येकालाच वाटते. हे क्षण कॅप्चर करण्यासाठी मोबाईल, कॅमेरा यांचा वापर केला जातो. प्रवासादरम्यान जवळ असणाऱ्या गॅजेट्सची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण इतर व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी ते गरजेचे असते. फोनबरोबर आणखी कोणते गॅजेट्स सोबत ठेवल्याने प्रवासात मदत मिळू शकते जाणून घ्या.
डिटॅचेबल फ्लॅश :
डिटॅचेबल फ्लॅश फोनमध्ये सहजरित्या फिट होतो. जर एखाद्या ठिकाणी लाईट व्यवस्थित नसेल तर तुम्ही या डिटॅचेबल फ्लॅशचा वापर करुन चांगले फोटो काढू शकता.
फास्ट चार्जर :
प्रवासादरम्यान एका ठिकाणी जास्त वेळ थांबणे शक्य नसते, त्यामुळे प्रवासाला निघण्याआधी एक फास्ट चार्जर घ्या, ज्यामुळे फोन लगेच चार्ज करता येईल.
पॉवर बँक
काही ठिकाणी कधीकधी फोन चार्ज करण्यासाठी वीज उपलब्ध नसते किंवा चार्जिंगची सोय नसते, अशावेळी तुमच्याकडे पॉवर बँक असणे गरजेचे असते. कमीतकमी १०,००० एमएएचची पॉवर बँक प्रवासादरम्यान सोबत असायला हवी.
आणखी वाचा : दैव बलवत्तर म्हणून… काम सुरू असताना लॅपटॉपचा स्फोट झाला अन्… तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळला मोठा अपघात
वायरलेस इअरबड्स
लांबचा प्रवास असेल तर कंटाळा येतो, अशावेळी वायरलेस इअरबड्स तुमचे मनोरंजन करण्यास मदत करू शकतात. वायरलेस इअरबड्सची क्वालिटी चांगली असते तसेच यामुळे फोनचे चार्जिंग कमी वापरले जाते.
सोलर पॉवर चार्जर
जर तुम्हाला कुठेच फोन चार्ज करण्याची संधी मिळाली नाही किंवा कुठेचा चार्जिंग कनेक्शन उपलब्ध नसेल तर अशावेळी सोलर पॉवर चार्जर मदत करू शकतो. सोलर पॉवरवर उन्हाच्या मदतीने तुम्ही फोन चार्ज करू शकता.