Tech Layoffs: जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम जगातील नोकऱ्यांवर झाला आहे. अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली आहे. एका बाजूने नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच कर्मचारी कपातीचा वेग दुपटीने वाढला आहे. गेमेटा,डिस्ने या कंपन्यांनी दुसऱ्या फेरीतील कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. आता यामध्ये आणखी एका दिग्गज कंपनीचा समावेश होणार आहे. Amazon कंपनीसुद्धा आपल्या दुसऱ्या फेरीतील कर्मचारी कपात करणार आहे.
Amazon कंपनीने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता दुसऱ्या फेरीमध्ये विविध विभागांमधील तब्बल ९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कर्मचारी कपात Amazon Web Services, People, Experience, Advertising आणि Tswitch या विभागांमध्ये करण्यात येणार आहे. Amazon च्या या निर्णयानंतर अनेक कर्मचारी लिंकडेनवर त्यांच्या गोष्टी सांगण्यासाठी पुढे आले आहेत आणि संपूर्ण परिस्थितीबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.
amazon मधील असाच एक कर्मचारी ज्याला या कपातीमध्ये आपली नोकरी गमवावी लागली आहे. तो कंपनीनेमध्ये जुलै २०२२ मध्ये जॉईन झाला होता. तो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून या कंपनीत नोकरी करता होता. त्याने याबाबदल एक लिंकडेनवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने असे लिहिले आहे की, Amazon च्या कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून मी काम करत असलेल्या माझ्या नोकरीवर परिणाम झाला. आज कंपनीतील माझा अधिकृतरीत्या शेवटचा दिवस आहे. माझी पहिलीच नोकरी इतक्या लवकर गेली ही अत्यंत निराशाजनक बाब आहे. मात्र ही गोष्ट जरी निराशाजनक असली तरी मला मिळालेल्या संधीबद्दल मी कंपनीचा आभारी आहे. तसेच ज्या सहकारी आणि व्यवस्थपकांसोबत मी काम केले त्यांनी देखील मला पाठिंबा दिला त्याबद्दल यांचेदेखील मी आभार व्यक्त करतो. मी Amazon मधील माझ्या नोकरीच्या काळामध्ये अनेक लोकांना भेटलो जे सध्या या परिस्थितीमध्ये माझी मदत करत आहेत.
कंपनीचे सीईओ अँडी जस्सी म्हणाले की, अर्थव्यवस्थेमधील आव्हानात्मक परिस्थिती कायम आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष कठीण बनले आहे. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात आम्ही मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली आहे. कंपनीसाठी खर्च कमी करणे खूप महत्वाचे असल्याचे सांगत ३० नोव्हेंबरला जस्सी यांनी NYT डीलबुक समिटमध्ये कर्मचारी कपातीच्या निर्णयाचे समर्थन केले.
गेल्याच आठवड्यात फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटानेसुद्धा १०,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. मेटाने पहिल्या फेरीमध्ये ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.