Amazon : करोना महामारीमुळे सर्वांचे हाल झाले होते. बऱ्याच देशांची अर्थव्यवस्था कोलमडली होती. भारतासह अनेक देशांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदीमुळे नागरिक घरांमध्ये अडकले. अशा वेळी त्यांच्यावर घरुन काम करावे लागले. कोविड १९ चा प्रभाव कमी होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जावा लागला. या काळामध्ये लोकांना घरुन काम करायची सवय लागली. टाळेबंदी उठवल्यानंतरही बहुतांश लोकांनी घरुन काम करण्याला प्राधान्य दिले.
अॅमेझॉन ही अमेरिकन कंपनी जगभरामध्ये आपली सेवा पुरवते. या कंपनीचे कर्मचारी प्रत्येक देशामध्ये आहेत. करोना काळामध्ये या कंपनीने कर्मचाऱ्यांना घरुन ‘वर्क फ्रॉम होम; करण्यास सांगितले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सोयीनुसार घरुन किंवा ऑफिसमधून काम करायची मुभा दिली. याबाबत निर्णय त्या-त्या विभागातील सदस्य मिळून घेऊ शकत होते. आता या निर्णयामध्ये नवा बदल करत आठवड्यातून निदान ३ दिवस ऑफिसला जाऊन तेथून काम करण्याचे आदेश अॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी दिले आहेत. या आदेशाची अंंमल बजावणी १ मे २०२३ पासून केली जाणार आहे.
एलॉन मस्कने भारतातील ‘या’ शहरांमधील ट्विटरची कार्यालये बंद करण्याचा दिला आदेश, जाणून घ्या कारण
अॅमेझॉनच्या ब्लॅागमध्ये त्यांनी या संदर्भामध्ये चर्चा झाली असल्याचे सांगितले. यामध्ये त्यांनी ”या निर्णयामुळे कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी काही दिवसांसाठी का होईना ऑफिसला जातील आणि ऑफिसच्या आसपासच्या असंख्य उद्योगांना यामुळे चालना मिळेल” असे म्हटले आहे. कस्टमर सपोर्ट आणि सेल्सपर्सन अशा काही कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अपवाद असून ते बाहेरुन काम करु शकणार आहेत. भारतामध्ये बंगळुरु, चैन्नई, हैदराबाद, मुंबई, पुणे या शहरांमध्ये अॅमेझॉन कंपनीची कार्यालये आहेत.