कोलकातामधील ८३ वर्षांच्या एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्यासोबत नुकताच एक फसवणुकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीत वृद्ध अधिकाऱ्याला तब्बल २.५ लाखांचा फटका बसल्याचे समजते. कोलकात्यामधील ठाकूरपुकूर येथे राहणाऱ्या एस. पी. सिन्हा यांच्यासोबत हा सर्व प्रकार घडलेला आहे. बँकेच्या सर्व व्यवहारांसाठी श्री. सिन्हा कायम बॅंकेची भेट घेत होते. परंतु, एके दिवशी त्यांना बँकेचा फोन आला आणि लाखोंचा फटका त्यांना सहन करावा लागला.
श्री. सिन्हा यांना एके दिवशी एक फोन आला. फोनमधून बोलणाऱ्या व्यक्तीने तो सिन्हा यांचे जिथे पेन्शन खाते होते, त्या बँकेच्या टेबल क्रमांक ३ वरून बोलत असल्याचे सांगितले. श्री. सिन्हा कायमच त्यांच्या बँकेच्या कामासाठी टेबल ३ वर जात असल्याने त्यांचादेखील फोन करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास बसला. नंतर फोनवरील व्यक्तीने ऑनलाइन केवायसी (KYC) पडताळणीसाठी फोन केला असल्याचे सांगितले. त्यामुळे सिन्हा यांनी लगेचच त्या व्यक्तीला होकार दिला आणि ते सर्व स्टेप्स पूर्ण करू लागले, असे मेट्रोच्या वृत्तानुसार समजते.
हेही वाचा : इन्स्टाग्रामवर एकापेक्षा अधिक अकाऊंट अॅड आणि स्विच कसे करायचे? तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, तर लक्षात घ्या या सोप्या टिप्स…
“दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबर रोजी दुपारी मला एक फोन आला. फोन केलेल्या व्यक्तीने, माझे ज्या बँकेत पेन्शनचे खाते आहे, त्या बँकेमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यासोबतच माझा खाते क्रमांकसुद्धा सांगितला. हे सर्व ऐकून जेव्हा मी त्याला विचारले की आज बँकेला सुट्टी आहे; मग तरी फोन कसा काय केला? तर त्यावर त्याने, ‘आज केवळ व्हेरिफिकेशन विभाग चालू आहे,’ असे सांगितले आणि सोबत केवायसी (kYC) अपडेट करण्यासाठी हा फोन केला असल्याचीही माहिती दिली” असे सिन्हा यांनी सांगितल्याचे, इंडिया टुडेच्या माहितीवरून समजते.
फोनवरील व्यक्तीवर विश्वास ठेवून सिन्हा यांनी हळूहळू सर्व प्रक्रियेला सुरुवात केली; परंतु या सर्व गोष्टी फोनवर घडत असल्याने, त्यांना काही गोष्टी समजत नव्हत्या. नवीन पिढीतील मुलांना या गोष्टी समजतात आणि सहज करता येतात म्हणून पुढची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपला फोन त्यांनी त्यांच्या ११ वर्षांच्या नातवाला दिला. परंतु, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन लाख ५७ हजार ६५० रुपये त्यांच्या खात्यातून डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना आला. त्यासोबतच इतर सर्व फिक्स डिपॉझिट्स आणि रिकरिंग खात्यांचा अॅक्सेससुद्धा गमावला गेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सिन्हा यांच्यासारख्या कितीतरी वृद्ध व्यक्ती ऑफलाइन पद्धतीच्या बँकिंगवर विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना अशा ऑनलाइन प्रक्रियेची सवय नसते. त्यासोबतच ११ वर्षांच्या लहान नातवालादेखील अशा फसवणूक करणाऱ्या फोनबाबत माहिती नसल्याने हे प्रकरण घडले.
परंतु, यासर्व घटनेमुळे सर्व वृद्ध आणि मोठ्या वयाच्या व्यक्तींनी बँकेकडून किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारांसाठी एखादा फोन आल्यास त्या फोनची व्यवस्थित पडताळणी करणे आणि त्याबाबत साधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. त्यासोबतच बँक कोणत्याही आर्थिक गोष्टींचे व्यवहार फोन करून किंवा फोनवरून करीत नाही हे लक्षात घ्यावे.
हेही वाचा : गुगल अकाउंट डिलीट कसे करायचे असा प्रश्न पडलाय? या सोप्या स्टेप्स लक्षात ठेवा, पाहा
आपले केवायसी (KYC) अपडेट करायचे असल्यास, ते खातेधारकाने बँकेत जाऊन अपडेट करून घ्यावे.
केवायसी ऑनलाइन अपडेट करण्यासाठी काय करावे ते पाहा :
आपल्या बँकेच्या ऑनलाइन बँकिंग पोर्टलवर जावे.
तेथील KYC या टॅबवर क्लिक करावे.
नंतर ‘KYC Update’वर क्लिक करावे.
तुम्ही बदल/अपडेट करण्याची माहिती निवडावी
मग बदल करून, आवश्यक ती कागदपत्रे सबमिट करावी.
मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करावा.