अभिनेता अन्नू कपूर यांची ऑनालाईन फसवणूक झाल्याची घटना पुढे आली आहे. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ४.३६ लाख रुपये काढले आहेत. बँक अधिकारी असल्याचे सांगत केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांना एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने अन्नू यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती दिली, नंतर ओटीपी मागितला. अन्नू यांनी ओटीपी दिल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ४.३६ लाख रुपये काढून घेतले.
त्यानंतर अन्नू यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी हा पैसा फ्रिज केला आहे. पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईने अन्नू यांना ३ लाख ८ हजार रुपये परत मिळणार आहे. अन्नू कपूर यांच्यासोबत घडलेली घटना हा ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा आहे. गुप्त माहिती कुठलीही शहानिशा न करता दुसऱ्यांना दिल्याने त्याने मोठे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी करू नये याबाबत आपण जाणून घेऊया.
१) वेरिफाईड बॅज चेक करा
कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी आधी त्याचे वेरिफाईड बॅज तपासा. नंतरच ते अॅप डाऊनलोड करा. वेरिफाईड नसलेले अॅप डाऊनलोड केल्यास फोनमधील सर्व माहिती चोरी होण्याची शक्यता असते. तसेच बँकेचे अॅप डाऊनलोड करताना आधी माहिती घेऊनच ते डाऊनलोड करावे. खोटे अॅप असल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
२) फ्री वायफायने पैशांचा व्यवहार करू नका
फ्री वायफायने पैशांचा व्यवहार करू नका. यातून देखील ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. बॅकेची माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ देऊ नका. फ्री वायफायचा वापर टाळा.
३) ओटीपी कुणालाही शेअर करू नका
बँकेशी संबंधित किंवी इतर कुठलेही पेमेंट करताना ओटीपी तुमच्या फोनमध्ये येतो. हा ओटीपी कुणालाही शेअर करू नका. याने तुमची फसवणूक होऊ शकते. ओटीपीची माहिती स्वत: जवळच ठेवा.
४) अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
मेसेजद्वारे लिंक पाठवून सायबर गुन्हेगार तुम्हाला लुटू शकतात. त्यामुळे मॅसेजवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. आणि बँकेच्या नावाने जर असा मॅसेज आला तर त्याची तक्रार करा. फ्री गिफ्ट्स मिळेल या आशेने ब्राउजरमध्ये देखील काहीही ओपन करू नका.