सध्या संपूर्ण देशभरामध्ये नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस हे सणासुदीचे आहेत. लवकरच दिवाळीचा सण देखील येणार आहे. सणासुदीच्या निमित्ताने लोकं नवनवीन वस्तू खरेदी करत असतात. याच निमित्ताने अॅपलने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये आपल्या अनेक प्रॉडक्ट्सवर कंपनी आकर्षक डिस्काउंट देणार आहे. कंपनी आयफोन १५, मॅकबुक एअर, आयपॅड्स आणि अन्य डिव्हाइसवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देणार आहे. तसेच कंपंनीने आपल्या सर्व स्टोअर्सवर देखील या ऑफर्सची घोषणा केली आहे. म्हणजेच ग्राहकांना मुंबई आणि दिल्लीमधील स्टोअर्समध्ये देखील या सेलचा लाभ घेता येणार आहे. या सेल आणि ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या मॉडेल्सवर ६ हजारांपर्यंत कॅशबॅक आणि डिस्काउंट मिळू शकतो. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस वर ५ हजारांपर्यंत कॅशबॅक ऑफरसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच कंपनी आपल्या दिवाळीच्या सेल अंतर्गत आयफोन १४ सह आयफोन १४ प्लस वर ४ हजारांची सूट, आयफोन १३ वर हजारांपर्यंतची सूट आणि आयफोन SE वर २ हजारांपर्यंत डिस्काउंट देत आहे. तसेच कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सवर १० हजारांपर्यंत कॅशबॅक ऑफर देत आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
आयफोन १५ हा फोन ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तर आयफोन १५ हा ८९,९०० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आयफोन ची किंमत १,३४,९०० रुपये आणि प्रो मॅक्स मॉडेलची किंमत १,५९,००० रुपये इतकी आहे. तसेच आयफोन १३ ची किंमत सध्या ५९,९०० रुपये आहे. कंपनीने मॅकबुक एअर एम २ नुकताच भारतात लॉन्च केला होता. आता हा मॅकबुक एअर एम २ १० हजारांच्या कॅशबॅकसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र ही ऑफर केवळ १३ इंच आणि १५ इंचाच्या मॉडेलवरच लागू असणार आहे. १३ इंचाचा मॅकबुक एअर एम २ मॉडेल भारतात १,१४,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता.
मॅकबुक एअर एम १ खरेदी करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला ८ हजारांचा कॅशबॅक मिळणार आहे. या मॉडेलची मूळ किंमत ९९,९०० रुपये आहे. Amazon या मॅकबुकची विक्री ६९,९९० रुपयांमध्ये करत आहे. अॅपल कंपनी आपल्या सर्व प्रॉडक्ट्सवर सूट देत आहे. कंपनी ११ आणि १२.९ इंचाच्या आयपॅड प्रो मॉडेलवर तसेच आयपॅड एअरवर ५ हजारांचा डिस्काउंट देणार आहे. तसेच दिवाळी सेलअंतर्गत आयपॅड मिनीवर ३ हजारांचा डिस्काउंट ऑफर मिळणार आहे.