काल कंपनीचा Wonderlust इव्हेंट पार पडला. यावेळी इव्हेंटची सुरूवात कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी केली. त्यामध्ये Apple ने आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज भारत आणि जागतिक स्तरावर लॉन्च केली आहे. नवीन डिव्हाइसचे प्री बुकिंग हे १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर याची विक्री २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच कंपनीने आयफोन १५ सिरीजसह वॉच सिरीज ९ देखील लॉन्च केली आहे. कंपनीने भारतात दिल्ली आणि मुंबईमध्ये आपली अधिकृत रिटेल स्टोअर्स सुरू केली आहेत. त्यानंतर हा पहिलाच आयफोन लॉन्च असणार आहे.
आयफोन १५ चे फीचर्स
आयफोन १५ ला मागच्या वर्षीच्या तुलनेत काही मोठे अपडेट मिळाले आहेत. फ्रंट कॅमेरा आणि फेस आयडीसाठी नवीन डायनॅमिक आयलंड कट-आउटचा समावेश आयफोन १५ मध्ये करण्यात आला आहे. हे फिचर गेल्या वर्षीच्या प्रो मॉडेल्समधून घेतले गेले आहे. कंपनीने आयफोन १५ मध्ये मागील वर्षीच्या प्रो मॉडेल्समध्ये असणाऱ्या चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस या मॉडेलमध्ये A16 Bionic चिप देण्यात आली आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास या मॉडेल्समध्ये कंपनीने ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. जो आयफोन १४ व १४ प्लस पेक्षा चारपट जास्त आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस : भारतातील किंमत
आयफोन १५ ची भारतातील किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते. ही किंमत १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची आहे. तर आयफोन १५ प्लसच्या १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ८९,९०० रुपयांपासून सुरू होते. हे दोन्ही फोन्स खरेदीदार निळा, गुलाबी, पिवळा, हिरवा आणि काळ्या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत.
१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या आयफोन १५ ची किंमत ७९,९०० रुपये, २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये तर ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत १,०९,९०० रुपयांपासून सुरू होते. तर आयफोन १५ प्लसच्या १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये, २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत ९९,९०० रुपये आणि ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत १,१९,९०० रुपयांपासून सुरू होते.