Apple iPhone 16 Price: मोबाइल, स्मार्टवॉच आणि डिजिटल उपकरणांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ॲपल कंपनीने नुकतीच आयफोन १६ या नव्या मोबाइल फोन मॉडेलची घोषणा केली. यासह ॲपल वॉच १०, एअरपॉडस् ४ आणि इतर काही उत्पादने लाँच करण्यात आले आहेत. नव्या आयफोनची प्री बुकिंग १३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २० सप्टेंबरपासून विक्री करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. ॲपलकडून जेव्हा नव्या मॉडेलची घोषणा करण्यात येते, तेव्हा जुन्या मॉडेलच्या किंमतीमध्ये घसरण होते का? याची अनेकांना उत्सुकता असते. जुन्या मॉडेलची किंमत कमी झाल्यानंतर ते मॉडेल विकत घेण्यात अनेकांना रस असतो. तत्पूर्वी आयफोन १६ च्या चार मॉडेल्सच्या किंमती काय असतील? हे पाहू

आयफोन १६ ची किंमती किती?

भारतात iPhone 16 ची (१२८ जीबी) किंमत ७९,९०० पासून सुरू होईल. त्यानंतर २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेजची किंमत यापेक्षा पुढे असेल. आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपये, तर आयफोन १६ प्रोची किंमत १,३४,९९० रुपये आणि आयफोन १६ प्रो मॅक्स १,५९,००० रुपये असेल. चारही मॉडेलची ही मुळ किंमत असून स्टोरेजच्या पर्यायानुसार किंमत वाढेल.

हे वाचा >> Apple iPhone 16 Launch Event 2024 : नवीन लूक, डिझाइनसह आयफोन १६, ॲपल एअरपॉडस् लाँच; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

आयफोन १५ ची किंमत किती?

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आयफोन १५ च्या किंमतीमध्ये किंचित घट पाहायला मिळाली होती. आता आयफोन १६ लाँच झाल्यानंतर आयफोन १५ च्या किंमतीमध्ये १०,००० रुपयांची घट पाहायला मिळत आहे. १२ सप्टेंबर २०२३ रोजी आयफोन १५ या नव्या मॉडेलची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा त्याची सुरुवातीची किंमती ७९,९०० इतकी होती. तर आयफोन १५ प्लस ८९,९०० ला मिळत होता. आता दोन्ही मॉडेलच्या किंमतीमध्ये दहा हजारांची घट झाली असून अनुक्रमे ६९ हजार ९०० आणि आयफोन प्लस ७९ हजार ९०० ला मिळत आहे. आयफोनच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.

आयफोन १४ आणि १४ प्लसच्या किंमती किती?

आयफोन १४ सप्टेंबर २०२२ साली लाँच करण्यात आला होता. याही मॉडेलची किंमत आता कमी करण्यात आली आहे. आयफोन १४ लाँच केला तेव्हा बेसिक मॉडेलची किंमत ७९,९०० रुपये आणि आयफोन १४ प्लसची किंमत ८९,९०० इतकी होती. आता आयफोनच्या अधिकृत संकेतस्थळावर आयफोन १४ च्या बेसिक मॉडेलची किंमत ५९,९०० इतकी असून आयफोन १४ प्लस ६९,९०० रुपयांना मिळत आहे.

आयफोन १५ लाँच झाल्यानंतर मागच्याच वर्षी आयफोन १४ च्या किंमतीमध्ये १० हजार रुपयांची घट करण्यात आली होती. आता पुन्हा १० हजार रुपये कमी केल्यामुळे लाँच केलेल्या किंमतीहून वीस हजार रुपये इतका डिस्काऊंट सध्या आयफोन १४ वर मिळणार आहे.

आयफोन १५ प्रमाणेच या मॉडेलची खरेदी एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि अमेरिकन एक्सप्रेस कार्डवरून केल्यास ३,००० रुपयांचा कॅशबॅक डिस्काऊंट मिळू शकतो.