Apple is testing To Unlock iPhone Using Heartbeat : सुरवातीला फोनमध्ये पासवर्ड सेट करण्याच्या फीचरचा पाहिजे तितका वापर केला जात नव्हता. पण, आता मोबाईल, गॅलरी, विविध ॲप अनलॉक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. जसे की, पासवर्ड, पिन, टच आयडी, फेस आयडी, फिंगरप्रिंट सेन्सर इत्यादी. पण, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की एखादा फोन तुमच्या हृदयाच्या ठोक्यांनी अनलॉक होईल? तर आता ॲपल कंपनी त्यांच्या डिव्हाइसेससाठी या नवीन बायोमेट्रिक फीचरची चाचणी करत आहे. म्हणजेच ॲपल कंपनीच्या आयफोन व मॅक अनलॉक करण्यासाठी तुम्ही तुमच्या हृदयाचे ठोके वापरू शकणार आहात.
ईसीजी-बेस बायोमेट्रिक फीचर:
ॲपल त्यांच्या आयफोन ( iPhone) , आयपॅड ( iPad) आणि मॅकसह त्याच्या उपकरणांसाठी ECG (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) बायोमेट्रिक फीचरवर काम करत आहे. हे फीचर तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर आधारित असेल आणि तुमच्या हृदयाची ठोके जुळल्यावर तुमचे डिव्हाइस अनलॉक करेल.
हृदयाच्या ठोक्यांसह अनलॉक करा:
प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाचा ठोक्याचा ताल फिंगरप्रिंट किंवा बायोमेट्रिक सेन्सरप्रमाणेच अनोखा असतो. ॲपल वॉच (Apple Watch) वर ईसीजी (ECG) ॲप वापरून, ॲपल हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवू शकते आणि युजर्सचे आयडेंटिफिकेशनचा एक प्रकार म्हणून त्याचा वापर करू शकते.
ॲपल वॉचसह करा फोन अनलॉक:
जेव्हा तुम्ही तुमचे ॲपल वॉच तुमच्या आयफोन किंवा इतर ॲपल उपकरणांशी जोडता तेव्हा हे नवीन तंत्रज्ञान काम करेल. ॲपल वॉच घातलेले वापरकर्ते ECG ॲपद्वारे त्यांच्या हृदयाच्या ठोके वापरून त्यांचे डिव्हाइस अनलॉक करण्यास सक्षम असतील.
सुरक्षा :
हे नवीन तंत्रज्ञान आयफोन, आयपॅड आणि मॅक युजर्ससाठी सुरक्षा म्हणून आणखीन एक पर्याय ऑफर करते आहे . फेस अनलॉक, फिंगरप्रिंट आणि पासवर्ड व्यतिरिक्त, वापरकर्ते त्यांच्या हृदयाचे ठोके वापरून त्यांचे डिव्हाइस अनलॉक करू शकतात. मात्र, हे तंत्रज्ञान व्यावसायिकदृष्ट्या कधी उपलब्ध होणार याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध अद्याप तरी समोर आलेली नाही .
दरम्यान, ॲपलने नुकतेच भारतात आपल्या आयफोन मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. आयफोन १५ आणि आयफोन १४ सह अनेक आयफोन मॉडेल्स कमी किंमतीत उपलब्ध आहेत. म्हणजेच काही लोकप्रिय आयफोन मॉडेल्सच्या किमतीत ३०० ते ६ हजार रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. भारत सरकारने मोबाइल फोन, मोबाइल पीसीबीए आणि मोबाइल चार्जरवरील मूलभूत सीमा शुल्क २० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर ही जबरदस्त ऑफर ग्राहकांना दिली जाते आहे .