आयफोनच्या कॅमेऱ्यासंबंधी काही तक्रारी पुढे येत होत्या. या पार्श्वभूमीवर अॅप्पल कंपनीने आयओएस या आपल्या ऑपरेटिंग सिस्टिमचा अपडेट जारी केल आहे. अलिकडेच अॅप्पलने आपली आयफोन १४ सिरीज लाँच केली आहे. यानंतर आयफोन १४ चा कॅमेरा वापरताना काही समस्या निर्माण होत असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर अॅप्पलने काही बग्स ठीक करून आयओएसचा नवा अपडेट जारी केला आहे.
काय होत्या समस्या?
स्नॅपचॅट, टिकटॉक या अॅपसाठी आयफोनचा कॅमेरा वापरताना कॅमेरा वायब्रेट होणे, तसेच कॅमेरा फोकस करताना मोबाईलने आवाज करणे या समस्या होत्या. आयओएस १६.०.२ हा नवीन अपडेट फोनमध्ये टाकल्यावर या समस्या सुटणार आहेत. तसेच जुन्या आयफोनवरून आयफोन १४ मध्ये डेटा हस्तांतरित करताना समस्या येत होत्या. डिस्प्ले काळा दिसायचा. नव्या अपडेटने ही समस्या देखील सोडवण्यात आली आहे.
पॉपअपची समस्या
केवळ कॅमेरा वायब्रेशनच नव्हे एक पॉपअप फोनमध्ये यायचा जो युजरना आपण कॉपी पेस्ट करत असल्याचा सतत इशारा द्यायचा. सुरुवातीला हे कुठले सुरक्षा फीचर असेल असे वाटत होते. मात्र नंतर हे बग असल्याचे पुढे आले. सॉफ्टवेअर चेंज लॉगमध्ये व्हॉईस ओव्हरची समस्या तसेच टचला प्रतिसाद न देत असल्याची समस्या देखील सोडवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आयओएस १६.०.२ हा डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
आयफोन १४ च्या लाँचनंतर इतर फोन्सच्या किंमतीत घट
आयफोन १४ सिरीजच्या लाँचनंतर त्या खालील मॉडेल्सच्या किंमतीत घट झाली आहे. त्यामुळे आयफोन चाहत्यांसाठी काही सूटसह आयफोन घेण्याची संधी आहे. आयफोन १३, आयफोन १२ मिनी आणि इतर काही मॉडेल्सवर सूट मिळत आहे. तसेच, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सेलने आयफोनच्या किंमतीत अजून दिलासा दिला आहे. फोनवर थोडी आणखी सूट मिळत आहे.