काही लोकांना प्रवास करायला खूपच आवडते. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी बस, ट्रेन, विमान, वैयक्तिक गाडी, असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण, अनेकांना प्रवास सुरू झाला की, थोड्या वेळेतच उलटीची भावना होते. मग त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी आपण मोबाईल बघायला सुरुवात करतो किंवा गाडीत गाणी लावतो. पण, असे केल्यानेही अनेकदा मळमळू लागते किंवा डोके दुखण्यास सुरुवात होते. याच त्रासाला वैद्यकीय भाषेत ‘मोशन सिकनेस’ असे म्हणतात.
तर, धावत्या कारमध्ये फोन किंवा टॅबलेट वापरताना तुम्हालासुद्धा मळमळत असेल, तर ॲपल (Apple) कंपनीने यावर एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे. टेक जायंटने आयफोन आणि आयपॅडसाठी ‘व्हेइकल मोशन क्यूज’ (Vehicle Motion Cues) नावाचे एक नवीन फीचर सादर केले आहे; जे प्रवाशांचा ‘मोशन सिकनेस’ कमी करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. तुम्ही कारमधून जात असताना तुमच्या शरीराची हालचाल होते. पण, तुम्ही त्या हालचालींशी जुळत नसलेल्या स्क्रीनकडे पाहत असता आणि त्यामुळे मळमळण्याची भावना निर्माण होऊ शकते. या सामान्य समस्येमुळे बऱ्याच लोकांना प्रवासात त्यांचे डिव्हाइस आरामात वापरता येत नाहीत.
हेही वाचा…आता LG स्मार्ट टीव्हीत चालणार AI ची जादू ; ‘या’ भन्नाट फीचर्ससह जाणून घ्या लेटेस्ट मॉडेल्सची किंमत
ॲपलच्या Vehicle Motion Cues या नवीन फीचरचा ही समस्या सोडविणे हाच उद्देश आहे. हे स्क्रीनच्या कडांवर ॲनिमेटेड ठिपके दाखवून कार्य करते. हे ठिपके तुमच्या मेंदूला तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीने जाणवणाऱ्या हालचालींचा ताळमेळ घालण्यास मदत करतात; ज्यामुळे ‘मोशन सिकनेस’ दूर होऊ शकतो. हे फीचर आयफोन्स आणि आयपॅड्समध्ये आधीच तयार केलेल्या प्रगत सेन्सरचा लाभ घेते. हे सेन्सर तुम्ही धावत्या वाहनात असताना तुम्ही कुठे जाणार आहात याचा शोध घेऊन वेगाचे संकेत सक्रिय करतात. याचा अर्थ ते चालू करण्यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज भासत नाही; जेव्हा आपल्याला त्याची आवश्यकता असते तेव्हाच ते आपोआपच कार्य करते. म्हणजे तुम्ही सोईनुसार या फीचरला ऑन किंवा ऑफ करू शकता. या नवीन फीचरमुळे तुम्ही आरामात तुमचे डिव्हाइस धावत्या गाडीत वापरू शकता.
ॲपलची उपकरणे वापरण्याचा वापरकर्त्यांचा अनुभव आणखीन छान करण्यासाठी कंपनीने या फीचरबद्दल सांगितले आहे. मोशन सिकनेसच्या समस्येचे निराकरण करून, ॲपल वापरकर्त्यांना चालत्या वाहनांमध्ये कनेक्ट राहण्यासाठी आणि मनोरंजन करण्यात मदत करत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कारमध्ये तुमचा आयफोन किंवा आयपॅड वापरताना अस्वस्थ वाटेल. तेव्हा लक्षात ठेवा की, ॲपलचे Vehicle Motion Cues तुमच्या मदतीसाठी आहे. फक्त एका साध्या अपडेटसह तुम्ही अधिक आरामदायी राईडचा आनंद घेऊ शकता.