काल Apple चा WWDC २०२३ इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये अॅपलने आपली अनेक प्रॉडक्ट लॉन्च केली आहेत. तसेच कंपनीने १५ इंचाचा MacBook Air लॉन्च करत असताना M2 MacBook Air ची किंमत कमी केल्याची अधिकृत घोषणा केली. १३ इंचाच्या M1 MacBook Air च्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अॅपल 13-inch MacBook एअरची नवीन किंमत
नवीन लॉन्च झालेल्या १५ इंचाच्या मॅकबुक एअरची किंमत १,३४ ९०० रुपये इतकी आहे. जी जुन्या १३ इंचाच्या एम २ मॅकबुक एअरपेक्षा १५ हजार रुपयांनी जास्त आहे. कंपनीने एम २ मॅकबुक एअरच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किंमतीमध्ये ५ हजार रुपयांची कपात केली आहे. याबाबतचे वृत्त द टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
कंपनीने किंमतीमध्ये कपात केल्यामुळे एम २ मॅकबुक एअरच्या एम २ चिपसेट आणि ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजच्या बेस मॉडेलची किंमत १,१४,९०० रुपये झाली आहे. तसेच ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही १,४४,९०० रुपये झाली आहे. कपात होण्याआधी याच्या किंमती अनुक्रमे १,१९,९०० आणि १,४९,९०० रुपये होती.
मॅकबुक M1 ची किंमत ९९,९०० रुपये आहे. याच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जेव्हा त्यांचे सेल सुरू असतात तेव्हा हे लॅपटॉप ग्राहकांना सवलतीच्या दरामध्ये खरेदी करता येऊ शकतात. दरम्यान कालच्या इव्हेंटची सुरूवात ही कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्या भाषणाने झाली.