आयफोनची क्रेझ सगळ्यांनाच असते. Apple चे लॅपटॉप, हेडफोन, आयपॉड अशी अनेक उत्पादनं लाखो युजर्सची पहिली पसंती असतात. बाजारपेठेत किंवा मोठमोठ्या कंपन्यंमध्ये अ‍ॅपल उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, या उत्पादनांना मोठा धोका निर्माण झाल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. Apple बरोबरच सॅमसंगच्याही उत्पादनांबाबत वापरकर्त्यांना काळजी घेण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. यामध्ये मोबाईल फोनबरोबरच टीव्ही, लॅपटॉप, आयपॅड, टॅबलेट अशा अनेक उपकरणांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन एक्स्प्रेसनं CERT-In अर्थात इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनाच्या हवाल्याने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, केंद्र सरकारनं अ‍ॅपल व सॅमसंग कंपनीची उत्पादनं वापरणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असून त्यातून वापरकर्त्यांची महत्त्वाची वैयक्तिक माहिती चोरी होण्याचा धोका आहे, अशी शक्यता केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आली आहे.

तुमच्याकडे Appleचं एखादं उत्पादन असल्यास…

या वृत्तानुसार, अ‍ॅपलच्या उत्पादनांमध्ये झालेल्या तांत्रिक समस्येमुळे ही उत्पादनं हॅक करणं हॅकर्ससाठी सुलभ होऊ शकतं. त्यामुळे हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती आणि इतर गोष्टी चोरण्याची व त्यांचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. याचा मोठा परिणाम प्रामुख्याने Apple फोनची ऑपरेटिंग सिस्टीम, आयपॅडची ऑपरेटिंग सिस्टीम, मॅकची (अ‍ॅपल कम्प्युटर्स) ऑपरेटिंग सिस्टीम, अ‍ॅपल टीव्हीची ऑपरेटिंग सिस्टीम, अ‍ॅपलच्या स्मार्ट वॉचची ऑपरेटिंग सिस्टीम व अ‍ॅपलच्या उत्पादनांमध्ये आधीपासूनच उपलब्ध असणाऱ्या सफारी ब्राऊजरवर होण्याची शक्यता आहे.

काय म्हटलंय CERT-In च्या निवेदनात?

इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं जारी केलेल्या निवेदनानुसार, अ‍ॅपलच्या उत्पादनांमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक समस्या आढळून आल्या आहेत. यामुळे हॅकर्सला तुमची संवेदनशील माहिती चोरणं, एखादा धोकादायक कोड तुमच्या उत्पादनामध्ये टाकणं, सुरक्षेचे सर्व स्तर सहज पार करणं, ऑथेंटिकेशन प्रक्रिया निष्क्रिय करणं, पूर्ण सिस्टीम बंद पाडणं अशा अनेक गोष्टी घडू शकतात.

Samsung च्या उत्पादनांबाबतही असाच इशारा

याआधी CERT-In नं सॅमसंगच्या उत्पादनांच्या बाबतीतही अशाच प्रकारचा इशारा दिला होता. यामुळे सुरक्षेबाबतच्या सर्व गोष्टी पार करून हॅकर्स तुमच्या फोनमधली किंवा टीव्ही वा लॅपटॉपमधली वैयक्तिक माहिती पाहू किंवा चोरी शकतात. तसेच, एखादा धोकादायक कोड तुमच्या उपकरणात टाकणंही हॅकर्सला यामुळे शक्य होतं. याचा सर्वाधिक धोका हा अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम ११, १२, १३ आणि १४ च्या उपकरणांना असल्याचंही CERT-In कडून नमूद करण्यात आलं आहे.

काय काळजी घ्यायला हवी?

दरम्यान, या परिस्थितीत युजर्सनं त्यांचे फोन, लॅपटॉप, आयपॅड अशा गोष्टींचा वापर करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषत: वेब ब्राऊजिंग करताना, एखादे त्रयस्थ मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करताना, एखाद्या मेसेज किंवा मेलमधल्या अटॅचमेंटवर क्लिक करून त्या उघडताना युजर्सनी हे सर्व तुमच्यापर्यंत पाठवणारे सोर्स किंवा व्यक्ती विश्वासार्ह आहेत किंवा नाही याची खातरजमा करणं आवश्यक आहे.

याशिवाय, युजर्सनी त्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर येणारे संशयास्पद मेसेजेसही काळजीपूर्वक वाचायला हवेत. जर तुमच्या उपकरणाच्या ऑपरेटिंग सिस्टीमचं नवीन अपडेटेड व्हर्जन उपलब्ध असेल, तर ते तातडीने इन्स्टॉल करा. कारण त्यामध्ये अशा हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी लागणारे महत्त्वाचे कोड असू शकतात. अ‍ॅपल व सॅमसंग हे बाजारातील सर्वात सुरक्षित असे ब्रँड मानले जात असले, तरी त्यांच्यावर हॅकर्सचा हल्ला होऊच शकत नाही असं अजिबात नाही. त्यामुळे वापरकर्त्यांनी अशा संभाव्य हल्ल्याच्या दृष्टीने कायम सतर्क राहणं आवश्यक आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple samsung products at risk for vulnerability possible hacking issue pmw
Show comments