सध्या बऱ्याच स्मार्ट घड्याळांच्या बॅटरी अगदी पटापट संपत आहेत. मात्र, या समस्येवर उपाय शोधण्याचे काम आता ॲपल करत आहे. टेक जायन्टने ऑक्टोबरमध्ये watchOS 10.1 हा अपडेट आणला होता. ॲपल वापरकर्त्यांनी आपल्या घड्याळांमध्ये हा अपडेट घेताच, घड्याळाची बॅटरी अगदी काही तासांतच संपत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‘मॅकरुमर्स’ [MacRumors] च्या माहितीनुसार, ‘watchOS 10.1 या अपडेटच्या समस्येवर लवकरच उपाय करण्यात येणार आहे’, असे टेक जायंटने ॲपलच्या अधिकृत सेवा प्रदात्यांसोबत, एक मेमो शेअर करत सांगितले. यासोबतच त्यांनी स्मार्ट घड्याळांची बॅटरी इतक्या भरभर संपण्याचे कारण काय असू शकते? त्याचसोबत या अपडेटचा किती वापरकर्त्यांना त्रास झाला आहे आणि कोणत्या मॉडेल्सना ही समस्या उदभवत आहे याची माहिती अजून आम्हाला समजलेले नाही, असे सांगितले.
काही दिवसांपासून ॲपल वॉचची सीरिज ५ ते अल्ट्रा २ च्या वापरकर्त्यांनी ॲपल सपोर्ट कम्युनिटी, रेडिट [reddit] आणि एक्स [पूर्वीचे ट्विटर] वरून या घड्याळाच्या पटकन संपणाऱ्या बॅटरीबद्दल तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ‘घड्याळाचा वापर करत नसलो तरीही त्याची बॅटरी संपून जाते’, अशी काहींची तक्रार आहे. तर काहींनी ‘घड्याळ १०० वरून काही तासांत शून्यावर येत आहे, त्यामळे या स्मार्ट घड्याळाचा काहीच उपयोग होत नाही’, असे निदर्शनास आणून दिले आहे.
हेही वाचा : युजर्सची मजा! ‘या’ प्लॅन्समध्ये मोफत मिळतंय Netflix सबस्क्रिप्शन, लगेच पाहा जिओ एअरटेलचे ‘हे’ भन्नाट आॅफर
ॲपल या प्रश्नावर उपाय शोधात आहे, पण तोपर्यंत वापरकर्त्यांनी रेडिट आणि एक्स [पूर्वीचे ट्विटर] वरून काही जुगाड शेअर केले आहेत.
काहींच्या म्हणण्यानुसार, ‘तुम्ही तुमच्या ॲपल वॉचच्या, होम स्क्रीनवरील विजेट स्टॅकमधून थर्ड पार्टी विजेट काढून टाका किंवा MobyFace हे घड्याळातील फेस ॲप अनइन्स्टॉल केल्याने तुमचा बॅटरी संपण्याचा प्रश्न सुटू शकतो’, असे सांगितले आहे. तर काहींनी, ‘जर तुम्ही बीटा चॅनेलवर असाल, तर तुम्ही तुमच्या ॲपल स्मार्ट वॉचमध्ये watchOS 10.2 हा अपडेट घेतल्याने बॅटरी भराभर संपणार नाही’, अशी टीप दिलेली आहे.