देशामध्ये मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी Apple ने आपली दोन रिटेल स्टोअर्स सुरू केली आहेत. सीईओ टीम कुक यांनी या दोन्ही स्टोअर्सचे उदघाटन केले. दोन्ही स्टोअर्सच्या उदघाटनावेळी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. आता या दोन्ही रिटेल स्टोअर्सबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ती माहिती काय आहे ते जाणून घेऊयात.
Apple चे सीईओ टीम कुक यांनी भारतात Apple BKC आणि Apple Saket या भारतातील दोन रिटेल स्टोअर्सचे उदघाटन केले. या दोन्ही स्टोअर्सनी मिळून तब्बल ४४ ते ५० कोटींची मासिक विक्री केली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे Apple आपल्या मुंबई आणि दिल्लीमधील स्टोअरसाठी अनुक्रमे ४० आणि ४२ लाख रुपये इतके मासिक भाडे देत आहे. याबाबतचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे.
उद्योग क्षेत्रातील दोन तज्ज्ञांनी खुलासा केला की, ही आकडेवारी दिवाळी नसलेल्या काळामध्ये भारतातील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरच्या कमाईच्या तुलनेत दुप्पट आहे. या आकडेवारीमुळे Apple स्टोअर हे महसुलाच्या बाबतीत भारतामध्ये सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील किरकोळ विक्रेता बनले आहे.
Apple बीकेसी ज्या दिवशी सुरू झाले त्या दिवशी तिथे १० कोटी रूपयांची विक्री झाली. एक मोठे इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर महिन्याला ७ ते ८ कोटी कमावते असे रिपोर्टमध्ये दिसून आले आहे. रिपोर्टनुसार, Apple साकेत हे दिल्लीमधील स्टोअर बीकेसी स्टोअरपेक्षा लहान आहे. बीकेसी स्टोअर हे २२,००० स्क्वेअर फूट आणि साकेत स्टोअर ८,५०० स्क्वेअर फूट इतक्या आकारात आहे. तरीदेखील साकेत स्टोअरने चांगली कामगिरी केली आहे. दोघांच्या आकारामध्ये प्रचंड फरक असून देखील दोन्ही स्टोअर्सनी सामान मासिक विक्रीची नोंद केली आहे. या दोन्ही स्टोअरमध्ये सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी ६ हजार पेक्षा जास्त लोकांची गर्दी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : VI ने लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स; नाईट डेटासह मिळणार…., एकदा पहाच
अहवालामध्ये असे सांगण्यात आले आहे, दोन्ही स्टोअर्सनी नवीन रेकॉर्ड केला कारण त्यांची सरासरी विक्री किंमत(ASP) इतर ब्रँड्सच्या तुलनेत खूप जास्त आहे. तज्ज्ञांच्या मते ही संख्या कंपनीच्या अंदाजापेक्षाही जास्त आहे. अॅपलने भारतात सुरू केलेल्या दोन नवीन रिटेल स्टोअरच्या विक्रीच्या महसुलावर भाष्य करण्यास नकार दिला.