दोनच दिवसांपूर्वी एका १२ वर्षीय लहान मुलीला झालेल्या कर्करोगाचे निदान केल्यानंतर आता अ‍ॅपल वॉचची आणखी एक करामत जगासमोर आली आहे. या खेपेस खून करून नवऱ्यानेच जिवंत गाडलेल्या पत्नीचे प्राण या अ‍ॅपल वॉचने वाचवले आहेत. नवऱ्याने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केल्यानंतर टेपने हात- पाय बांधून तिला थडग्यात जिवंत गाडले होते. पण हातातील या अ‍ॅपल वॉचने तिचे प्राण वाचवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : हिवाळ्यात ऊब तर उकाड्यात गारवा देणारे कापड कुणी केलेय तयार?

कधी अचानक वाढलेले हृदयाचे ठोके या अ‍ॅपल वॉचने लक्षात आणून दिले तर कधी अपघात झाल्यानंतर थेट इमर्जन्सी सर्व्हिसेस अर्थात आपात्कालीन सेवेला स्वतःच फोन लावत जखमींना मदतही केली आहे. अशाप्रकारे जखमी महिलेला मदत केल्याची घटना अलीकडेच वॉशिंग्टन डीसीमध्ये लक्षात आली तर जिवंत गाडलेल्या महिलेच्या मदतीची ही घटना सीएटलच्या वायव्येस ६० किलोमीटर्स अंतरावर घडली.

आणखी वाचा : सावधान: यु-टयूब पाहून ‘अशाप्रकारचे’ फटाके बनवाल तर पडेल महागात!

डेअली मेल या स्थानिक वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करून तिच्या नवऱ्याने हातापाय टेपने बांधले, तिच्या गळ्याभोवतीही टेप करकचून बांधण्याचा प्रयत्न त्याने केला होता. ४२ वर्षीय सूक आन हिने कशीबशी त्यातून सुटका करून घेत अ‍ॅपल वॉचचा वापर करत ९११ या इमर्जन्सी सर्व्हिसला फोन लावून पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळेस सूक आन भेदरलेल्या अवस्थेत होती. तिचे अपहरण करून तिच्या नवऱ्यानेच तिला मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तिच्या गळ्याजवळ, चेहऱ्याच्या खालच्या बाजूस आणि पायाच्या घोट्याजवळ टेपने घट्ट बांधलेले होते, तिला जखमाही अनेक झालेल्या होत्या, अशी माहिती घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दिली. तिला पुरण्याचा प्रयत्न केल्याने कपड्यांना खूप माती लागलेली होती. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांना इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी कॉल गेला त्याचवेळेस सूक आनच्या २० वर्षीय मुलीलाही आई संकटात असल्याचे नोटिफिकेशन अ‍ॅपल वॉचने स्वतःहून पाठवले.

आणखी वाचा : Flipkart Bumper Diwali Offer: सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनवर मिळतेय भरघोस सूट; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी!

अलीकडेच अ‍ॅपल वॉच चर्चेत आले ते १२ वर्षीय लहान मुलीला उघडकीस आलेल्या कर्करोगामुळे. सुरुवातीस तिच्या शरीराचे तापमान अचानक वाढते आहे, हे अ‍ॅपल वॉचने लक्षात आणून दिले. त्यानंतर तिला अ‍ॅपेंडिक्सचा त्रास लक्षात आला आणि नंतरच्या अधिक तपासण्यांमध्ये अचानक वाढू लागलेली कर्करोगसदृश गाठ लक्षात आली. तिच्यावर त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर तिच्या आईने अ‍ॅपलचे आभारही मानले. थेट जीवच वाचविण्यात घेतलेल्या या आघाडीने अ‍ॅपल वॉच सध्या जगभरात कौतुकाचा विषय ठरले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple watch rescued a women who was buried alive by husband vp