अॅपलच्या प्रत्येक आयफोनमध्ये एक नॉच आहे. पण अहवालानुसार आयफोन १४ मालिकेत अॅपल हे नॉच बदलण्यास तयार असून नवी होल-पंच डिझाईन आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता, ट्विटरवर अनेक लोक येणाऱ्या आयफोन सीरिज मध्ये होल-पंच डिझाईन कसे असू शकतात यावर मॉकअप सादर करत आहेत. आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स हे दोन मॉडेल्स होल-पंच डिझाईनसह बाजारात येतील अशी अफवा आहे.
आपल्याला अँड्रॉइड फोनवर जी गोलाकार होल-पंच डिझाईन पाहायची सवय आहे त्यापेक्षा वेगळा असा लंबगोल आकारातील नॉच आपल्याला आयफोन १४च्या सीरिज मध्ये पाहायला मिळेल असे ट्विटरवर सादर करण्यात आलेल्या मॉकअपवरून समजते. तसेच, असे सुद्धा सांगण्यात येत आहे की या नव्या होल-पंच नॉचसाठी आयफोन आपला प्रसिद्ध नॉच काढून टाकणार आहेत.
आयफोनवरील जुन्या नॉचमध्ये फेस आयडीसारखे अनेक महत्त्वपूर्ण सेन्सर्स आहेत. पण ट्विटरवर दाखवण्यात आलेल्या प्रतिमांनुसार आयफोन निर्माते हे सेन्सर्स होल-पंच डिझाईनमध्ये समाविष्ट करण्यासाठी थोडीफार तडजोड करू शकतात. अहवालानुसार, आयफोन १४ सीरिजच्या फक्त प्रो मॉडेलमध्येच हे लंबगोलाकार होल-पंच नॉच वापरण्यात येणार असून इतर मॉडेल्स जुन्याच नॉचसह रिलीज केले जातील.
आगामी आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स या मॉडेल्समधील लंबगोलाकार नॉचमध्ये एकच कॅमेरा असेल असे या मॉकअप्स मधून सांगण्यात येत आहे. नव्या होल-पंच नॉचसाठी अॅपल जुना नॉच सोडणार असल्याच्या अफवा गेल्या वर्षीपासून येत आहेत. आयफोन १३ सीरिज मध्ये अॅपलने नॉच किंचितसा कमी केल्यामुळे वापरकर्त्यांना अतिरिक्त स्क्रीन वापरता येत आहे.
हेही वाचा : Drone Delivery: आता ड्रोन करणार फूड डिलिव्हरी; ‘या’ पाच शहरात झाली यशस्वी चाचणी
अॅपल आयफोन १४ सीरिज मध्ये मिनी मॉडेल्स येणार नाही आहेत. आयफोन १४ सीरिज ही आयफोन १४, आयफोन १४ मॅक्स, आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स अशा ४ प्रकारात बाजारात येणार असल्याचं सांगितलं जातंय. जुन्या अहवालांनुसार, प्रो मॉडेल्समध्ये ट्रिपल रिअर कॅमेरे असतील आणि ते त्यांच्या पूर्ववर्ती प्रमाणेच 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येतील.