तंत्रज्ञान विश्वात दिवसेंदिवस मोठे बदल होताना दिसत आहेत. प्रत्येक कंपन्या नवनवीन उपकरणे बाजारात घेऊन येत आहेत, त्यामुळे ग्राहकांनासुद्धा नवे गॅजेट अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. तर आता सर्व कंपन्यांना मागे टाकत प्रसिद्ध कंपनी सॅमसंग एक अनोखी गोष्ट ग्राहकांसाठी घेऊन आली आहे. सॅमसंग लवकरच ‘गॅलेक्सी रिंग’ नावाची स्मार्ट रिंग लाँच करणार आहे.
सॅमसंग कंपनीचा अनपॅक इव्हेंट पार पडला. त्यामध्ये कंपनीने आपली अनेक नवीन प्रॉडक्ट्स लाँच केली आहेत. त्यात सॅमसंगने नवीन गॅलेक्सी स्मार्ट रिंगची घोषणा केली आहे, जी कदाचित गॅलेक्सी वॉचसारखी फीचर्स देऊ शकते. या स्मार्ट रिंगमध्ये काय खास असणार आहे, चला जाणून घेऊ या.
नुकत्याच संपन्न झालेल्या गॅलेक्सी अनपॅक कार्यक्रमात सॅमसंगने सगळ्यात शेवटी सांगितले की, कंपनी एक स्मार्ट रिंग लाँच करणार आहे. ही स्मार्ट रिंग पॉवरफुल आणि ॲक्सेसेबल असणार आहे. इव्हेंटमध्ये, सॅमसंगने आगामी प्रोडक्टचे नाव आणि डिझाइन उघड केले. सॅमसंग कंपनीने इतर कंपन्यांच्या स्मार्ट रिंगच्या पावलावर पाऊल ठेवत ही योजना राबवण्याचा विचार केला आहे. गॅलेक्सी स्मार्ट रिंगमध्ये हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजन पातळी, स्लीप ट्रॅकिंग आणि स्टेप काउंटर यांसारखी फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स ऑफर करणार आहे.
हेही वाचा…स्क्रीनवर वर्तुळ काढताच मिळेल माहिती; गूगल सर्च इंजिनमध्ये होणार ‘हे’ दोन बदल…
सॅमसंग क्लिनिकल रिसर्चचे सायंटिस्ट डॉक्टर मॅथ्यू विगिन्स यांच्या मते सॅमसंग हेल्थ ॲप लवकरच स्लीप ट्रॅकिंग अल्गोरिदम वापरून Apnea Symptoms लक्षणांचे निरीक्षण करणे, झोपेत हृदयाचे ठोके चेक करणे आणि रक्तातील ऑक्सिजन पातळी गॅलेक्सी एआयद्वारे (Galaxy AI) ट्रॅक करेल.
या स्मार्ट रिंगमध्ये ‘माय व्हिटॅलिटी स्कोअर’ नावाचे हेल्थ फीचर्सदेखील जोडले आहे, जे वापरकर्त्यांना त्यांची हृदय गती, ॲक्टिव्हिटी आणि झोप या आधारावर शारीरिक आणि मानसिक आरोग्य ट्रॅक करण्यास मदत करते. तसेच ॲपचे भविष्यातील अपडेट वापरकर्त्यांना त्यांची औषधे वेळेवर घेण्याची आठवण करून देईल. गॅलेक्सी रिंगला फिटनेस ट्रॅकिंग कार्यक्षमतेव्यतिरिक्त खास फीचर्सदेखील मिळतील, जे कंपनी त्यांच्या स्मार्टवॉचमध्येदेखील ऑफर करते. सॅमसंगने सांगितले की, गॅलेक्सी रिंग लवकरच लाँच करण्यात येणार आहे. पण, किंमत आणि लाँच तारखेबद्दल अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.